Vidarbha Politics : कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यावर किती प्रेम करावे, याचे मापदंड निश्चित नसतात. काही नेते कार्यकर्ते आणि जनतेच्या मनात घर करून बसतात. त्यातीलच एक नेते, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी काय करावे, तर मंगळवारी (ता. 19) चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात एकाच दिवशी, एकाच वेळी हजारो कार्यकर्त्यांनी तब्बल 151 सर्वधर्मीय धार्मिक स्थळांवर सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी प्रार्थना केली.
चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आता लोकसभेची निवडणूक लढत आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतो आहे. अशाच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे एकाच दिवशी, एकाचवेळी आपापल्या धार्मिक श्रद्धास्थानांवर मुनगंटीवार यांच्या संकल्पपूर्तीसाठी आराधना केली. लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांचा विजय दृष्टिक्षेपात आला असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी अशाप्रकारे एकाच वेळी, धार्मिक स्थळांवर आराधना करण्याचा हा प्रसंग दुर्मीळ मानला जात आहे. आपल्या नेत्याला यश मिळावे म्हणून त्यांचे चाहते विविध प्रकारच्या धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवाला साकडे घालतात. काही ठिकाणी होम, हवन, पूजन, अभिषेक केले जातात. काही समाज बांधवांकडून सामूहिक प्रार्थना आदींच्या माध्यमातून ईश्वराकडे नेत्याला यश मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते.
अगदी याच पद्धतीने भाजपच्या चंद्रपूर- वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सर्वधर्मीय प्रार्थना आणि महाआरतीच्या माध्यमातून प्रार्थना केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वधर्मीय नागरिकांनी एखाद्या राजकीय नेत्यासाठी अशा पद्धतीने आराधना करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे जाणकार सांगतात.