Election : अज्ञात व्यक्तीकडून ऑनलाइन पद्धतीने राजुरा विधानसभा मतदारसंघात अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीनं नोंदणी केलेल्या 6 हजार 853 मतदारांची नावं यादीतून काढण्यात आली आहेत. याप्रकरणाची योग्य तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे. लवकरच तपासानंतर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलिस विभागाला दिले आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी घोळ सापडला आहे.या मतदारसंघात निरंतर कार्यक्रम राबविण्यात आला आहे. निवडणूक आयोग हे अभियान राबवित आहे. यापूर्वी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली होती. 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. राजुरा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर यादी प्रसिद्ध करण्यात आली.
सापडला घोळ
राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांमधून 3 ऑक्टोबर 2024 पासून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन अर्ज दाखल झालेत. या नोंदणी अर्जांची सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली. राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीच्या तहसीलदारांमार्फत तपास करण्यात आला. त्यापैकी 6 हजार 853 अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या. अनेक अर्जात फोटो नव्हता. अर्जासोबत जन्मतारीख व रहिवासीचा पुरावा नव्हता. नाव व पुरावा हा वेगवेगळ्या व्यक्तीचा होता. एकच फोटो एकापेक्षा अधिक अर्जांवर होता. वेगवेगळया नावाने अर्ज होते. अशा स्वरुपाचे अर्ज तपासणीत आढळले.
Yavatmal Politics : येरावार, राठोड, नाईक, उईकेंचं भवितव्य ठरलं
पडताळणी
घोळ सापडलेल्या या सर्व अर्जांची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यानंतर सर्व अर्ज नाकारण्यात आलेत. त्यांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आलेला नाही. हे सर्व अर्ज हे व्होटर हेल्प अॅप किंवा एनव्हीएसपी पोर्टलवरून ऑनलाइन दाखल करण्यात आले होते. ऑनलाइन सुविधेचा गैरफायदा घेत हे चुकीचे फॉर्म भरल्याचे आढळले. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी यासंदर्भात तक्रार घेत आयपी अॅड्रेस आदीच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. यासाठी आयएमईआय क्रमांक, सीकार्ड, आयपी अॅड्रेस यांची तपासणी सायबर सेलने सुरू केली आहे. राजुऱ्याचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रवींद्र माने यांनी ही माहिती दिली.