विजांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि. 20) नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी शहराला अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूरकर पावसाची प्रतीक्षा करत होते. दरम्यान हवामान खात्याने red alert जारी केले होते. पहाटे 3 पासून विजांचा कडकडाट सुरू झाला. आणि त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. काही तासातच मुसळधार सरींनी शहराचे हाल केले. मनीष नगर, नरेंद्र नगर, लोखंडी पूल हे अंडरपास पूर्णपणे तलावसदृष्य झाले. विमानतळ चौकाकडे जाणारा रस्ता पाण्याने तुंबला होता. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.
जिल्ह्यात बेहाल
नांद (ता. उमरेड जि नागपूर) धरणाचे 7 दरवाजे 35 से.मी. ने उघडुन धरणातील पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. तरी नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी आपल्या स्वत:सह कुटूंबीयांची, जनावरांची योग्य ती खबरदारी घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत कुणीही नदी पात्र ओलांडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले. भिवापूर येथे नक्षी गट ग्रामपंचायत अंतर्गत मांगली गावात पुराचे पाणी शिरले आहे. गावाला जोडणा-या मार्गावरील नाल्यावर देखील पुराचे पाणी आल्यामुळे गावाचा ग्रामपंचायतशी आणि तालुकास्थळाशी संपर्क तुटला आहे.
आठवले, वडेट्टीवार यांचे दौरे रद्द
विमान सेवेला फटका बसल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे.
शाळा, महाविद्यालयांना सुटी
पावसामुळे रस्त्यांवर आणि पुलाखाली पाणी साचले. अनेक शाळांच्या परिसरात पाणी साचले. त्यामुळे काही शाळांनी सकाळीच सुटी रद्द केली. तर सकाळी साडेआठच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली.