High Court : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या मनमानी कारभाराचा फटका नोकरीची आस लावून बसलेल्या तरुणाईला सोसावा लागत आहे. एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण हडप करण्याचा प्रयत्न रावत यांनी केल्याचं आता सिद्ध झालं आहे. त्यामुळं बँकेच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. रावत यांनी उच्च हायकोर्टाचा अवमान करण्याची मजलही मारली आहे. त्यामुळं रावत आणि त्यांचा पक्ष संविधान, संविधानाने दिलेले आरक्षण, न्याय प्रक्रिया यांना मानत नाही का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नोकरभरती प्रक्रिया राबिवण्यात येत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ही भरती करण्यात येत होती. यासंदर्भातील तक्रार राकेश गावतुरे यांनी निवडणूक विभागाकडे केली होती. गावतुरे यांच्या तक्रारीनंतर निवडणूक विभागानं कारवाईचा बडगा उगारल्या. त्यामुळं बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागली. बँकेचे हेच नोकर भरती प्रकरण हायकोर्टात गेले होते.
कोर्टातील शब्दही फिरवला
बँकेच्या नोकरभरती संदर्भात 19 ऑक्टोबर 2023 रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी बँकेने ही भरती प्रक्रिया टीसीएस संस्थेच्या मदतीने राबविण्यात येईल, असं नमूद केलं होतं. त्यामुळं 20 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं याचिका निकालात काढली. कोर्टात वचन दिल्यानंतरही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळानं ठराव घेत आयटीआय लिमिटेड या कंपनीला भरतीचे काम दिले. या भरती प्रक्रियेवरही राकेश गावतुरे यांनी संशय व्यक्त केला आहे. उमेदवारांशी संपर्क साधता येईल, अशी माहिती आयटीआय संस्थेबाबत बँकेकडून पुरविण्यात आल्याचा हा आरापे आहे.
बँकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि संचालक मंडळानं चालविलेल्या या मनमानीमुळं आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमान याचिका दाखल झाली आहे. याचिकाकर्त्यांनी भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. टीसीएस कंपनी व्यतिरिक्त अन्य कोणतालाही नोकर भरतीचे काम देण्यात येऊ नये, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. आता या अवमान याचिकेची पुढील सुनावणी 3 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. संतोष रावत आणि बँकेतील त्यांचे सहकारी कोर्टालाही जुमानत नसल्याचा आरोप यातून होत आहे.
सहकार आयुक्तांचा दणका
उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल झाल्यानंतर आता सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी नोकर भरतीला स्थगिती दिली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे आदेश मंगळवारी (19 नोव्हेंबर) बजावण्यात आले आहेत. अप्पर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर यांनी हे आदेश बँकेला दिले आहेत. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना मोठा धक्का बसला आहे. रावत यांनी आचारसंहिता भंग केल्यामुळं त्यांची उमेदवारीच रद्द करावी, अशी तक्रारही राकेश गावतुरे आणि काही जणांकडून करण्यात आली आहे. त्यामुळं रावत यांचे कारनामे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला अडचणीचे ठरत आहेत.