महाराष्ट्र

Assembly Elections : काँग्रेसमध्ये बंडखोरी कायम; मुळक अपक्ष लढणार

Ramtek Constituency : रामटेकमधून भरणार उमेदवारी अर्ज; निवडणूक लढणार ठाम

महाविकास आघाडीने रामटेकमधून फारसे चर्चेत नसलेल्या विशाल बरबटे यांना तिकीट दिले व अनेक वर्षांपासून मतदारसंघात काम करणाऱ्या माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना धक्का बसला. आतापर्यंत त्यांच्याबाबत कमालीची अनिश्चितता होती. मात्र ते निवडणूक लढण्यावर ठाम असून काँग्रेसमधून बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ते रामटेकमधून अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.

काँग्रेस नेत्यांनी त्यांना तिकीट मिळावे यासाठी खूप प्रयत्नदेखील केले. मात्र त्यात अद्यापही यश आलेले नाही. या पूर्ण प्रकरणामुळे दुखावल्या गेलेल्या मुळक यांनी काहीही झाले तरी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. तिकीट नाही मिळाले तरी अपक्ष म्हणून ते निवडणूक लढणार आहेत. विशेष म्हणजे आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापर्यंत हा मुद्दा नेण्यात आला आहे.

रामटेकची जागा उद्धवसेनेला सुटली असून विशाल बरबटे यांना एबी फॉर्मही देण्यात आला आहे. मात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासाठी ही जागा परत मिळविण्यासाठी काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. रामटेकऐवजी उमरेडची जागा घेण्याचा प्रस्ताव उद्धवसेनेला देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकचा तिढा रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचला. राहुल गांधी यांनी या प्रकरणात लक्ष घालून रामटेकची जागा काँग्रेसला सोडवून घ्यावी, अशी विनंती प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आल्याची माहिती आहे.

Yavatmal Politics : नाना पटोले यांच्या निकटवर्तीयाची बंडखोरी

कार्यकर्त्यांना निरोप

राजेंद्र मुळक हे २९ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा निरोप काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. हिंगणा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचण्याच्या हालचाली सुरू असताना रविवारी माजी मंत्री रमेश बंग यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे तेथून निवडणूक लढण्याचा पर्यायदेखील मुळक यांच्यासमोर राहिलेला नाही.

अपक्ष लढेन पण..

उद्धव ठाकरे यांनी विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर मुळक मातोश्रीवर पोहोचले. त्यांनी रामटेकमधून लढण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यावर उद्धव यांनी शिवसेनेची मशाल हाती घेण्याची ऑफर दिली. पण मुळक यांनी ही ऑफर नाकारल्याचे कळते. वेळ आली तर अपक्ष लढेन पण शिवसेनेत जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती, अशी चर्चा आहे. त्यानुसार आता ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!