Tough Competition : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. महायुतीला पुन्हा सत्तेत यायचे आहे. महाविकास आघाडीला सत्ताधाऱ्यांचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत रोखायचा आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुंबळ लढत दिसणार आहे. अशात दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भातील चार मतदारसंघात बंडखोरीची टीकटीक ऐकू येत आहे. त्यामुळे नेत्यांची धडधड वाढली आहे. गडचिरोजी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, अहेरी, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे दादांच्या राष्ट्रवादीला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून मनोहर चंद्रीकापुरे हे निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. मात्र भाजपचे राजकुमार बडोले हे त्यांना आव्हान देऊ शकतात असे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये बडोले हे सामाजिक न्याय मंत्री होते. सध्या बडोले ‘लुपलाइन’वर आहेत. त्यांना पुन्हा राजकीय प्रवाहात यायचे आहे. अहेरी मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम हे विद्यमान आमदार आहेत. आत्राम हे महायुती सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत. त्यांना यंदाची विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. मात्र भाजपचे अंबरीश राजे आत्राम त्यांना आव्हान देऊ शकतात. अंबरीश राजे हे देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. परिणामी अहेरीत आत्राम विरुद्ध आत्राम असा सामना शक्य आहे.
Bangladesh Crises : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार
अहेरी सारखीच परिस्थिती यवतमाळच्या पुसदमध्ये आहे. येथे नाईक विरुद्ध नाईक लढत रंगण्याची चिन्हे आहेत. इंद्रनील नाईक यांना भाजपचे नीलय नाईक हे आव्हान देतील अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा हा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा बालेकिल्ला आहे. येथे त्यांना शिवसेनेचे (Shiv Sena) शशिकांत खेडेकर हे स्पर्धा करू शकतात. त्यामुळे विदर्भातील हे चार मतदारसंघ वाचविण्याचे आव्हान दादांच्या राष्ट्रवादीपुढे आहे.
अनेक ठिकाणी टेन्शन
राज्यभरातील अनेक मतदारसंघामध्येही अशीच स्थिती आहे. दिंडोरी, कागल, चांदगड, मावळ, इंदापूर, वडगाव शेरी, हडपसर, आष्टी, कोपरगाव, अकोले, येवला, अमळनेर, जुन्नर, वाई, निफाड मतदारसंघातही दादांना टेन्शन आहे. विशेष म्हणजे नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम, छगन भुजबळ डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना या बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजितदादा आता महायुतीमध्ये कसा टायमिंग साधतात, याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.