Buldhana constituency : मागील काही दिवसां पासून बुलढाण्यात सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर भाजपचे बंडखोर उमेदवार तथा भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांचे बंड थंड झाले आहे. यासाठी दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली. शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. महायुतीचे उम्मेदवार प्रतापराव जाधव यांच्या कार्यक्रमांमध्ये निमंत्रण नाही, ना फलकांवर फोटो यामुळे धडा शिकविण्यासाठी अर्ज दाखल करणाऱ्या विजयरावांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.
बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवला होता. छाननी मध्ये त्यांचा भाजपचा अर्ज बाद झाला मात्र अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम राहिला. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी केलेले मनधरणीचे प्रयत्न फोल ठरले. एवढेच नव्हे तर शेगाव येथील गजानन महाराजांचे दर्शन घेऊन शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला. तर खासदार जाधवांचे गृहक्षेत्र असलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथून त्यांनी काल शनिवार पासून प्रचाराला दणक्यात सुरुवात केली होती.
उमेदवारी अर्ज भरून महायुतीत खळबळ उडवून देणाऱ्या विजयराज शिंदे यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. श्वेताताई महाले यांना विजयराज शिंदेंशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. शिवाय ७ एप्रिलला नागपुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली.त्यात बावनकुळे यांनी शिंदेंना, ‘अर्ज मागे घ्या, युती धर्माचे पालन करा’ असे बजावले होते.त्यानुसार शिंदेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच, महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारात उतरण्याचे निश्चित केले आहे.
सोमवारी शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, निवडणुकीतून माघार घेत आहे. पक्षहित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. याप्रसंगी आ. महाले, गणेश मांटे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रतापराव जाधव शिंदेंच्या घरी !
या सर्व घडामोडीनंतर सायंकाळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे स्वतः शिंदे यांच्या बुलढाण्यातील रामनगर येथील निवासस्थानी दाखल झाले. शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत समजूत काढली.