महाराष्ट्र

Ravikant Tupkar : मी नंगा फकीर; माझ्या नादाला लागू नका

Prataprao Jadhav : रविकांत तुपकर यांचा केंद्रीय मंत्र्यांना इशारा 

Political War : पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचे राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या टीकेनंतर मुसळधार पावसाळी वातावरणातही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. ऐरवी ‘कुलमाइंड’ राहणारे आणि फक्त शेतकऱ्यांचा मुद्दा आला की आक्रमक होणाऱ्या तुपकरांनी प्रतापरावांना थेट इशाराच देऊन टाकला आहे. ‘मी नंगा फकीर आहे. माझ्या नादाला लागू नका’, असा इशारा तुपकर यांनी जाधवांना दिला आहे.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तुपकर यांच्यावर नामोल्लेख टाळत टीका केली होती. या टीकेला तुपकर यांनी प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत बुलढाणा, मुंबई, नागपुरात आंदोलनं केली. आता दिल्लीत आंदोलन करेल, असा इशारा तुपकर यांनी जाधव यांना दिला. यापुढे माझ्यावर बोलाल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर शेतकरी घेऊन आंदोलनाला बसेन असे तुपकर म्हणाले. तुपकर यांनी अलीकडेच बुलढाणा मतदारसंघातून लोकसभा (Lok Sabha) निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. परंतु तुपकरांना जेवढे मतदान झाले, तो आकडा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले.

विधानसभेची तयारी

लोकसभेनंतर आता तुपकर यांनी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) लढण्याचा निर्धार जाहीर केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात ते अपक्ष उमेदवार देणार आहेत.

Maratha Reservation : सरकार जरांगे यांचे लाड पुरवत आहे

बुलढाण्यातील निर्धार सभेत त्यांनी ही घोषणा केली. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तुपकरांवर गेल्या आठवड्यात केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ज्या पुढाऱ्यांनी आपल्याला प्रचंड विरोध केला, त्यांच्या गावातच आपल्याला मतदानात ‘लीड’ आहे. अनेक पक्षातील मोठ्या नेत्यांच्या गावात आपण मतदानाच्या बाबतीत पुढे आहोत. आपल्यामुळे नेत्यांना शेतकऱ्यांची ताकद कळली आहे. यापुढे काय करायचं हे सगळ्यांचं ऐकून पुढं जाऊ, असे तुपकर म्हणाले.

चिखली येथील नागरी सत्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आपल्यावर बोलले. प्रतापराव जाधवांनी आपल्या नादाला लागू नये. मी नंगा फकीर आहे. मी दिल्लीतही आंदोलन करायला येऊ शकतो, हे ध्यानात घ्यावे. केंद्रीय मंत्र्याला जर माझ्यावर 15 मिनिट बोलावे लागत असेल, तर त्यांना झोपेतही मी दिसत असेल. मोदींच्या बाजूला बसणारे मंत्री जर आपल्यावर बोलत असतील तर आपण दखलपात्र असल्याचेच सिद्ध होते, असेही तुपकर म्हणाले. ते केंद्रात मंत्री झाले. उपपंतप्रधान, पंतप्रधानही झाले, तरी माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला कामासाठी त्यांच्या दारात जायची वेळ येणार नाही. माझ्या साथीदारांच्या पाठीशी मी छातीचा कोट करून उभा आहे, असेही रविकांत तुपकर म्हणाले.

निवडणुकीचे रणशिंग

बुलढाणा येथील गोलांडे लॉन्समध्ये बैठकीत विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुपकरांना गळ घातली. त्यानंतर महत्वपूर्ण राजकीय घोषणा करत, तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे सांगितले.

Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीचा खात्मा

लोकसभा निवडणूक लढवून तब्बल अडीच लाख मतदान घेतले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झाला. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे फार कमी फरकाने विजयी होऊ शकलेत. आता देखील तुपकरांनी सहाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्याचा फायदा महायुतीला होणार आहे, अशी राजकीय चर्चा आहे. तुपकरांच्या या निर्णयामागे कुणाचे राजकीय पाठबळ आहे का? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

खटाटोपाचे नेमके कारण

रविकांत तुपकर यांच्या घोषणेनंतर महायुतीत आनंदाचे वातावरण निर्माण आहे. तुपकरांनी उमेदवार उभे केले, तर त्याचा सर्वाधिक फायदा महायुतीलाच होणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीचा कौल पाहता अशीच चर्चा होत आहे. एका वरिष्ठ नेत्याने तुपकरांची ही घोषणा म्हणजे शरद पवार (Shrad Pawar) व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर दबाव टाकण्याचा कार्यक्रम असल्याचे सांगितले. या दोघांनी तुपकरांना चर्चेला बोलवावे, यासाठी हा खटाटोप असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!