बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी विजयाचा चौकार लावित चार वेळ खासदार बनण्याचा बहुमान पटकावला आहे. शिंदे गटाचे जाधव यांची लढत महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्याशी असली तरी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रवीकांत तुपकर किंगमेकर ठरताना दिसत आहेत. महाविकास आघाडीकडून तिकीटासाठी इच्छुक असलेल्या तुपकरींना तिकीट नाकारणे बुलढाण्यात महाविकास आघाडीला चांगलेच महागात पडले. अपक्ष म्हणून २ लाख ४९ हजार ९६३ विक्रमी मते मिळविणारे तुपकर अवघ्या काहीच मतांनी प्रा. खेडेकरांच्या मागे राहिले.
बुलढाणा मतदारसंघात १० अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पहिल्यांदाच दोन प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारासह अपक्षाची तिहेरी लढत पाहायला मिळाली. यामध्ये अपक्ष उमेदवाराने बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल २ लाख ४९ हजार ९६३ मते मिळविली. या माध्यमातून मताधिक्याचा विक्रम नोंदविला असून विजयी आणि पराभूत दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या संख्येवर त्यांचा परिणाम दिसून आला. बुलढाणा येथील रहिवासी रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळीशी जुळलेले आहेत.
इतिहासात होणार नोंद
तुपकरांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीकडून त्यांनी उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. पण त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. ते अर्ज मागे घेणार असल्याची कुजबुजही संपूर्ण जिल्ह्यात त्यावेळी सुरू होती. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत थेट लोकसभा निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यांच्यामुळे दुहेरी लढतीचे तिहेरी लढतीत रूपांतर झाले आणि निकालाअंती त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात नोंद करता येतील, असे मताधिक्य गाठल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रतापराव जाधव यांना घाटाखालील खामगाव आणि जळगाव जामोद या मतदारसंघाने प्रचंड मताधिक्य दिले, एवढे की त्या आधारावरच ते विजेते ठरले. होमग्राउंड असलेल्या मेहकर विधानसभेत त्यांची नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्याशी ‘टाईट फाईट’ झाली. शेवटी २४३ मतांची निसटती आघाडी मिळवली. मेहकर विधानसभेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले तुपकर नरेंद्र खेडेकर यांच्यापेक्षा केवळ ७९ मतांनी मागे होते. प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर यांच्यात मेहकर विधानसभेत केवळ ३२२ मतांचे अंतर राहिले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाने रविकांत तुपकर यांना भरभरून आशीर्वाद दिले. तुपकर यांनी सिंदखेडराजा विधानसभेत तब्बल ७४ हजार ७५३ मते घेत प्रतापराव जाधव यांच्यावर २९ हजार ९८९ मतांची आघाडी घेतली. मात्र रविकांत तुपकर खामगाव आणि जळगाव जामोदमध्ये खूप मागे पडले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातही रविकांत तुपकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे या मतदार संघात प्रतापरावांच्या विजयापेक्षा अपक्ष उम्मेदवार रविकांत तुपकरांच्या पराजयाची जास्त चर्चा होत आहे.
प्रतिष्ठा आणि भवितव्याची लढत
२००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये बाजी मारून खासदार जाधव जिल्ह्याचे मोठे नेते झाले. मात्र चौथी लढत त्यांच्यासाठी निर्णायक आणि भावी राजकारणाची दिशा ठरविणारी ठरली. ‘अँटी इन्कबन्सी’, बंडखोरीमुळे लागलेला डाग, मतदारांची व्यापक नाराजी, भाजपाची दावेदारी, वंचितचा कमकुवत उमेदवार, यामुळे यंदाची लढत त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरली. मात्र, अनुभव, नियोजन, अचूक व्यूहरचना या त्रिसूत्रीने त्यांनी यावर मात केली. यामुळे ते विजयाच्या शर्यतीत खंबीरपणे टिकून राहिले. यंदाचा विजय त्यांना आणखी मोठा करणारा आणि ‘दिल्लीत मोठी संधी’ देणारा ठरला आहे. तसेच जिल्ह्यातील शिंदे गटावर त्यांचेच प्रभुत्व कायम ठेवणारा राहील.