महाराष्ट्र

Ravi Rana : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटीत बंद दाराआड चर्चा

Mahayuti 2.0 : नवनीत राणा यांच्यानंतर रवी राणा मुंबईत दाखल 

New CM Of Maharashtra : नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अद्याप काही दिवसांचा अवधी असला तरी मुंबईत वेगाने घडामोडी घडत आहेत. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यानंतर आता रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर राणा यांनी फडणवीस यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली. दोन्ही नेत्यांमधील चर्चा बंद दरवाजा आड सुरू होती. 

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होण्यापूर्वी राज्यातील काही नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यामध्ये अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचाही समावेश होता. गेल्या काही काळापासून नवनीत राणा आणि रवी राणा दोघेही महायुतीसोबत आहेत. महाविकास आघाडीच्या विरोधात रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुंबईत आंदोलन केलं. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती.

मंत्रिपदासाठी लॉबिंग

प्राप्त माहितीनुसार बडनेरा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जिंकल्यानंतर आता रवी राणा मंत्री पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे रवी राणा यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अमरावती मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू यांचा पराभव झाला आहे. या पराभवामागे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलेला प्रचार देखील कारणीभूत आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच नेत्यांनी एकत्र येत नवनीत राणा यांचा पराभव घडवून आणला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदारसंघांमध्ये रवी राणा यांनाही या विरोधाचा सामना करावा लागला. भाजपचे तुषार भारतीय यांनी राणा यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपने त्यांना निलंबित केला आहे.

Congress : जिचकार, मुळकांनंतर आता बंटी शेळकेंचे निलंबन?

परिश्रमाचे फळ अपेक्षित

दुसरीकडे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे सुपुत्र अभिजीत अडसूळ यांच्याशी असलेल्या राजकीय वैरातून राणा यांनी अडसूळ यांच्या मतदारसंघात उमेदवार दिला होता. भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना या मतदारसंघातून युवा स्वाभिमानने उमेदवारी दिली होती. त्यामुळे मतांत विभाजन झालं. परिणामी अभिजीत अडसूळ यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सर्व घटनाक्रमानंतरही भाजपने रवी राणा यांच्याशी जवळीक कायम ठेवली आहे. त्यामुळे रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं सांगण्यात येत आहे.

रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अमरावतीसह विविध ठिकाणी भाजप साठी काम केलं आहे. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी भाजपसाठी अनेक ठिकाणी प्रचारही केला होता. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नवनीत राणा यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे नाही केंद्र तर निदान राज्यांमध्ये तरी मंत्रीपद मिळावे अशी रवी राणा यांची इच्छा आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!