गौरी-गणपतीचा सण ध्यानात घेऊन सरकारने रेशन कार्डवरील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. मात्र सण जवळ आले तरीही पुरवठादाराकडून अद्याप रवाच पोहोचला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये अजूनही पूर्ण शिधा वेटिंगवर आहे. त्याला आणखी पाच दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यंदाच्या ‘आनंदा’त फक्त रव्याचाच शिधा मिळणार का? असा प्रश्न गोंदियाकर विचारत आहे.
भाजप-शिंदे गट शिवसेनेचे सरकार आल्यानंतर गोरगरिबांच्या घरातही सणावाराला गोडधोड तयार करता यावे यासाठी आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय घेतला. तेव्हापासून राज्य शासनाकडून सणउत्सवात आनंदाचा शिधा रेशन लाभार्थ्यांना पुरविला जात आहे. आता 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. 10 सप्टेंबरला गौरींचे आगमन होणार आहे. अशात रेशन लाभार्थ्यांना परत एकदा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
5 प्रकारचे जिन्नस असलेला हा आनंदाचा शिधा रेशन लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांतून वितरित केला जातो. यामध्ये एक किलो तेल, एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर व एक विशेष पिशवी असते. या विशेष पिशवीत चारही जिन्नसांचे प्रत्येकी एक पाकीट टाकून तयार केलेली एक पिशवी म्हणजे आनंदाचा शिधा होय. मात्र, जिल्ह्याला फक्त रवा मिळाला आहे. उर्वरित चार जिन्नस अद्याप मिळालेले नाहीत.
शिधामधील रवाच जिल्ह्याला मिळाला आहे, तर उर्वरित गोष्टींसाठी आणखी चार-पाच दिवसांची वाट बघावी लागणार असल्याची माहिती मिळाली. यामुळे या आनंदाचा शिधा वाटप होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत ‘द लोकहित’ने जिल्हा पुरवठा विभागाकडून अधिक माहिती घेतली. तेव्हा विभागाकडून 2 लाख 51 हजार 975 लाभार्थ्यांसाठी आनंदाच्या शिधाची मागणी करण्यात आली होती, असे सांगण्यात आले. मात्र, शासनाकडून 2 लाख 46 हजार 936 शिधांनाच मंजुरी देण्यात आली आहे. अशात पुरवठा विभागापुढे नवीच समस्या उभी झाली आहे. सर्व गोष्टी हाती आलेल्या नसल्यामुळे आनंदाचा शिधा वितरण उशिरा सुरू होणार असे दिसून येत आहे. त्यात मागणीपेक्षा कमी शिधा मंजूर झाल्याने पुरवठा विभागाची अडचण होत आहे.