प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना भाजप व संघ परिवाराकडून हिंदुत्वाचे कार्ड समोर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या वक्तव्याच्या अवतीभोवती प्रचार करण्यावर भर देण्यात येत असून विशेषत: सोशल माध्यमांवर तर याच्याशी निगडित मोठ्या प्रमाणावर पोस्ट करण्यात येत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजवर अनेकदा जातीपातीच्या राजकारणाऐवजी हिंदूंनी एकत्रित येण्याची भूमिका मांडली आहे. नागपुरात झालेल्या वेगवेगळ्या समन्वय बैठकीत सहसरकार्यवाह अतुल लिमये तसेच अरुण कुमार यांनीदेखील जातीपातींपेक्षा भाजपने हिंदुत्वावर भर दिला पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले होते. मागील काही दशकांचा इतिहास पाहिला तर भाजपसाठी हिंदुत्व हाच सत्तेचा मार्ग राहिला आहे. मात्र, 2019 नंतर राज्यातील परिस्थिती बदलली आहे.
विशेषत: मराठा आरक्षणामुळे राज्यभरात जातीचे राजकारण जोरात आहे. जातीच्या राजकारणाच्या खेळात भाजपला हवे तसे यश मिळत नाही अशी संघ धुरिणांचे मानणे आहे. त्यामुळेच हरयाणातील भाजपच्या यशानंतर संघ परिवारातील जुळलेल्या संघटनांकडून हिंदुत्वावर आधारित प्रचारावर भर देण्यात येत आहे. जातीपातीचे राजकारण दूर सारून हिंदू म्हणून एकत्रित येणे गरजेचे असल्याच्या ‘पोस्ट’ किंवा त्याच्याशी निगडित कंटेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.
संघ परिवारातील विविध संघटनांकडून लहान-लहान बैठका घेत मतदार जागृतीवर भर देण्यात येत आहे. मतदारांनी मतदान करावे हा त्यांचा पहिला मुद्दा असतो आणि त्यानंतर जातीपातींऐवजी हिंदुत्वाचा विचार करून मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. भाजपकडूनदेखील काही ठिकाणी याच मुद्द्यावरून होर्डिंगबाजी सुरू झाल्याचे चित्र आहे.
संघ अलर्ट मोडवर
महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपला नामुष्की सहन करावी लागली. विदर्भात तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वगळता एकाही भाजप नेत्याला यश आले नाही. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रवादीवर पराभवाचे खापर फोडले होते. राष्ट्रवादीला सोबत घेतले नसते तर भाजपचा पारंपरिक मतदार दुरावला नसता. या निर्णयाने सर्वसामान्य मतदारांमध्ये भाजपबद्दल कमालीची नाराजी निर्माण झाली आहे, असेही खासगीत बोलले जाऊ लागले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अलर्ट मोडवर आहे, असे सांगितले जाते.