Nagpur Meeting : अपात्र आणि असक्षम उमेदवार विधानसभा निवडणुकीमध्ये दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. संपूर्ण गावाचा विरोध असतानाही पैशाची देवाण-घेवाण करून भाजपने विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासंदर्भात मौन बाळगून असल्याने आता मतदारांनी आणि संघाच्या स्वयंसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरवली आहे. नागपूर येथे रविवारी (10 नोव्हेंबर) संघाची प्रांत बैठक झाली. या बैठकीमध्ये अकोला पश्चिमच्या एका उमेदवारामुळे अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाला कलंक लागत असल्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला.
भारतीय जनता पार्टीसमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हातबल आहे, असा मेसेज आता स्वयंसेवक आणि मतदारांमध्ये जात असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात विजय अग्रवाल यांचे नाव ऐकल्यानंतर संघाच्या बैठकीला कोणीही येत नसल्याचे वरिष्ठ संघ नेत्यांना सांगण्यात आले. सर्वाधिक विरोध अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे संघाने विजय अग्रवाल यांना पाठिंबा द्यायला लावल्यास आपल्याला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. सगळेच निष्ठावान स्वयंसेवक आणि भाजपचे कार्यकर्ते पूर्णपणे नाराज होतील, ही चर्चा बराच वेळ पर्यंत प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत झाली.
अलीमचंदानींमध्ये काय खोट?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हरीश अलीमचंदनी यांच्या नावाची ‘स्ट्रॉंग शिफारस’ करण्यात आली होती. मात्र अकोला पश्चिममध्ये उमेदवारी देताना राजकारणाच्या आकाशात अलीकडेच पुन्हा उदयाला आलेल्या ‘चंद्राने’ सात कोटी रुपये घेतल्याचा आरोप संघाच्या बैठकीतही गाजला. या नेत्याने स्थानिक उमेदवाराशी डील केली आहे. ‘आपण दोघे भाऊ, मिळून पैसा खाऊ, अशी ही डील असल्याचे संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे आपला उमेदवार चुकीचा आहे. अशात केवळ उमेदवार भाजपचा आहे म्हणून त्याला पाठीशी घातले, तर अकोल्यात संघाच्या नावाला मोठा कलंक लागेल. संघाच्या आणि सामान्य नागरिकांच्या या सर्व प्रतिक्रियांचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत सादर झाला आहे.
अकोला जिल्ह्यासह काही मतदारसंघांमध्ये भाजपने संघाची नाराजी पत्करत उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांचा काय करायचं? यासंदर्भात प्रांताच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचे उदाहरणही देण्यात आले. अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांच्या नावाला विरोध होता. तरीही भाजपने हट्ट करून त्यांना उमेदवारी दिली. या निर्णयाने भाजपने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. असाच प्रकार विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात झाला आहे. भाजपला मतदान करण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांची संख्या मोठी आहे. त्यांची मतं विजयाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.
बैठकीत ठरलं
संघाच्या प्रांत बैठकीत अकोला पश्चिमसह कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहायचे, याचा निर्णय आता झाला आहे. अद्याप या निर्णयाचा अधिकृत संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांपर्यंत पोहोचलेला नाही. लवकरच हा संदेश स्वयंसेवकांना पोहोचणार आहे. अकोला पूर्व मतदारसंघ, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर शहर आणि जिल्हा याबाबतीत संघाचे मत ‘प्लस’ मध्ये आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत मात्र संघाचे मत अद्यापही ठामपणे ‘मायनस’च्याही खाली आहे. त्यामुळे लवकरच स्वयंसेवकांना योग्य तो संदेश जाणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात सहभागी न होण्याची सूचना सर्व स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. सर्व स्वयंसेवकांनी संघाचं काम करावं. निवडणूक प्रचार हा मुख्य अजेंडा नाही, असं सांगण्यात आला आहे.
Harish Alimchandani : बंडखोरीचे खरे कारण ‘तुम्ही येथे अपेक्षित नाही’
सत्ता पाहिजेच का?
अलीकडेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व संघचालक डॉ. मोहन भागवत यांनी एका भाषणात सत्तेबद्दल भाष्य केले होते. हाती सत्ता असली की, बराच फरक पडतो. सत्ता असल्यामुळे राष्ट्रहिताची कामे वेगाने करून घेता येतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. परंतु याचा अर्थ चुकीच्या, असक्षम, अपात्र आणि नकली हिंदुत्व असलेल्या प्रत्येकाला पाठीशी घालायचं असा अजिबात होत नाही, असं संघाच्या प्रांत बैठकीत स्पष्ट करण्यात आलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सत्य, प्रामाणिकपणा, हिंदुत्व आणि शिस्त यावर चालते. त्यामुळे या चार तत्त्वांची कोणी गद्दारी करत असेल तर त्याला पाठीशी घालता येणार नाही. असा व्यक्ती संघाचा असो की भाजपचा त्याला योग्य ती जागा दाखवलीच पाहिजे, असं मत सर्व स्वयंसेवकांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे या तत्त्वांची जर तडजोड करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चुकीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यास स्वयंसेवकांना भाग पाडले तर, संघाच्या प्रतिमेवर खरंच मोठा डाग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संघाच्या प्रांत बैठकीत अत्यंत सावधगिरीने निर्णय झाला आहे.