Mahayuti : महायुती स्थापन होऊन आता अडिच वर्षं लोटली आहेत. अजितदादांचा महायुतीत समावेश होऊनही एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी वेगवेगळे नसून ‘हम सब एक है’ चा नारा निवडणुकीत देण्यात आला. निवडणूक दणक्यात जिंकून महायुतीने आपल्या दुसऱ्या टर्मचा कारभारही आता सुरू केला आहे. पण या संपूर्ण पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीप्रमाणे महायुतीच्या आमदारांना भेटीचं निमंत्रण धाडलं आहे. आता हे निमंत्रण अजित पवार स्वीकारणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
नागपुरात हिवाळी अधिवेशन असताना भाजप आमदारांचे बौद्धिक होत असते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. 2014 मध्ये सत्ता आल्यापासून तर याची जास्तच चर्चा होत असते. शिवसेनेचे काही आमदार या बौद्धिक वर्गाला उपस्थित राहतात, काही राहात नाहीत. पण जवळपास दिड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपसोबत आहे. वैचारिक भिन्नता असलेले दोन पक्ष एकत्र आले आहेत. भाजप-शिवसेना युती अनेक वर्षांपासून आहे आणि ‘हिंदुत्व’ हा दोघांचाही अजेंडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र स्वतःला पूर्णपणे फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे पाईक समजत आले आहेत. सत्तेत सामील झाल्यावरही त्यांनी वैचारिक चूल वेगळीच ठेवली.
जाणे टाळले
यापूर्वी दोनवेळा संघ कार्यालयात जाण्याचा योग असतानाही अजित पवार यांनी जाणे टाळले. यावरून राष्ट्रवादी अद्याप भाजपमध्ये वैचारिकदृष्ट्या विलीन झालेली नाही, हे स्पष्ट झाले. अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचे देता येईल. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी संघ कार्यालयासमोरील रेशीमबाग मैदानावर लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार उपस्थित होते. ताफ्यातील सर्व गाड्या संघ कार्यालयाच्या आवारात लागलेल्या होत्या.
संघ कार्यालयाच्या परिसरात ताफा लागलेला असल्यामुळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री पायी चालतच परिसरात आले. त्यानंतर ते एकनाथ शिंदे व फडणवीस डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे दर्शन घ्यायला गेले. पण, अजित पवार आपल्या गाडीत बसले आणि घाईतच निघून गेले. यापूर्वी देखील एकदा त्यांनी संघ कार्यालयात जाण्याचे टाळले होते. मात्र, आता महायुतीने तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि तिन्ही पक्षांसोबत जुळलेल्या संघटनांच्या सहकार्यानेच निवडणूक जिंकली आहे. याची जाणीव ठेवून अजित पवार संघ कार्यालयात जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
19 डिसेंबरचं निमंत्रण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या सर्व आमदारांना 19 डिसेंबरला संघ कार्यालयात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार हे निश्चित आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 41 आमदार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.