J. Nandakumar : सध्या जग संकटात आहे. दहशतवादाचा आणि धार्मिक कट्टरवदाचा धोका वाढला आहे. यावर मात कशी करावी याचे उत्तर जगाजवळ नाही पण या समस्येवर मात करण्याची शक्ती केवळ भारत आणि हिंदू चिंतनात आहे. याची जाण जगाला झाली आहे. या सर्व संकटांवर विजय मिळविण्यासाठी हिंदूंनी जात, पात, पंथ विसरून एकत्र येण्याची गरज आहे. सध्या नवरात्र सुरू आहे. यातील देवीचे रूप म्हणजे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती यांचा संगम होय. जगातील आणि देशातील संकटांवर मात करण्यासाठी या त्रिशक्तींचे जागरण व्हावे हेच कार्य संघ करीत असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य जे. नंदकुमार यांनी व्यक्त केले.
येथील रा. स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवात 6 ऑक्टोबर रोजी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी डॉ. भरत पटोकार, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांची उपस्थिती होती.
संघटित व्हावे.
जे. नंदकुमार म्हणाले, ‘ब्रिटिशांनी अशा पद्धतीने शिक्षण प्रणाली राबविली की, आमच्या देशातील बुद्धिवान लोकांनाही स्वत: हिंदू आहोत असे म्हणण्याची लाज वाटत होती. हाच भाव सर्व समाजाच्या मनात निर्माण झाल्याने आमच्या समाजाची हानी झाली. अशा भीषण आणि विषम स्थितीत डॉ. हेडगेवारांनी समाजाचे सखोल अध्ययन करून हिंदूंच्या मनात प्रथम आत्मविश्वास निर्माण केला, तो संघाच्या शाखांच्या माध्यमातून. फार प्राचीन काळी जेव्हा महिषासुराचे अत्याचार वाढले होते तेव्हाही तत्कालीन समाज आत्मविश्वास गमावून बसल्याने राक्षसाचा दहशतवाद वाढला. अशा वेळी देवीच्या रूपात देवतांनी संघटित होऊन इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती अवताराच्या रूपात एका उद्देशाने अवत्तीर्ण झाली आणि तिने राक्षसाचा नायनाट केला आहे.’ नंदकुमार म्हणाले की, आजही देशात आणि इतरत्र तशीच भीषण स्थिती असून त्यावर मात करण्यासाठी हिंदूंनी त्रिशक्ती रूपात संघटित व्हावे.
ब्रिटिशांना भारतीय संस्कृती व धर्म यांचे काहीच ज्ञान नव्हते. तरीही त्यांनी आमच्या धर्माबाबत लिहून आमच्या लोकांचा आत्मविश्वास नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण प. पू. डॉ. हेडगेवारांनी यावर संघ शाखांच्या माध्यमातून विलक्षण तोडगा काढला आणि देशातील सर्व हिंदूंना संघटित करण्याचे अपूर्व कार्य केले. म्हणून आज आपण गर्वान आम्ही हिंदू आहोत असे ठासून म्हणू शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता सांगितली.
संघातून मूल्य, सेवाभावाचे शिक्षण मिळते!
समाजासाठी कार्य करताना उद्देश आणि विचार यात स्पष्टता हवी. संघातून शिस्त, संयम, सेवाकार्य आणि विश्वास तथा मूल्य यांचे शिक्षण मिळते. आमच्या महान संस्कृतीचे रक्षण आम्हीच यातून केले पाहिजे असे यावेळी डॉ. भरत पटोकार म्हणाले.