Police Action : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोलकाता, बदलापूर, अकोला येथील घटनांवर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच पुन्हा अकोल्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. अकोट फाइल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मामाने आपल्याच दहा वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मामाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अकोला पुन्हा एकदा हादरले आहे.
कोलकाता येथे एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करण्यात आल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. 13 ऑगस्टला घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. याप्रकरणी बदलापूरमध्ये 20 ऑगस्टला प्रचंड जनक्षोभ उसळला होता. बदलापूरमध्ये रेलरोकोही करण्यात आला. याप्रकरणी आता पीडितेच्या पालकांनी शाळा आणि पोलिसांवर आरोप केले आहेत.
अकोल्यातील दुसरी घटना
हा घटनाक्रम ताजा असतानाच अकोल्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एका नराधम शिक्षकाने विकृतीचा कळस गाठला. सहा विद्यार्थिनींचा अश्लील व्हिडीओ दाखवत विनयभंग केला. या घटनेनंतर राज्यासह अकोला जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आरोपीला शिक्षकाला पोलिसांनी तत्काळ अटक केली. आता पुन्हा एका संतापजनक घटनेने अकोला हादरले आहे. तेल्हारा तालुक्यातील दहा वर्षीय मुलगी शिक्षणासाठी अकोल्यातील आपल्या मामाकडे राहायला होती. एक महिन्यापूर्वी मुलीचे आई-वडील घरी नसताना आरोपी युवराजने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी त्याने मुलीला दिली. रोज होणाऱ्या अत्याचारापासून कंटाळत पीडित मुलीने भेटीला आलेल्या वडिलांना घटनाक्रम सांगितला. त्यानंतर आरोपीचे कृत्य उघडकीस आले. पीडित मुलीच्या वडिलांनी अकोट फाइल पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी मामाला अटक केली. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हाही दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास अकोट फाइल पोलिस करीतत आहेत.
महाविकास आघाडीचा बंद
राज्यात वाढत जाणाऱ्या अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.