Shiv Sena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पदाधिकारी चिंतन सभा नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी काँग्रेस नेत्यांना इशाराच देऊन टाकला. खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या विजयात आमचा वाटा मोठा आहे. लोकसभा तुम्हाला दिली, पण आता विधानसभा देणार नाही, असे म्हणत गोडबोले यांनी बंडखोरीची तयारी केली आहे.
रिंगणात काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे आणि शिवसेनेकडून राजू पारवे हे प्रमुख उमेदवार होते. निवडणूक प्रचारादरम्यानच्या काही घटना गोडबोलेंनी सांगितल्या. काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांचा पक्ष असल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले, हे कुणीही विसरता कामा नये.
रामटेक मतदारसंघात शिवसेनेच्या विचाराने चालणारे कार्यकर्ते आहेत. यामुळेच काँग्रेसचे उमेदवार शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) पाठिंब्याने निवडून आले आहेत, असेही ते म्हणाले.
ठाकरेंचा सिंहाचा वाटा
पक्षाचे नाव गेले चिन्हसुद्धा गेले. पक्षफुटीमुळे त्यांच्या शिवसेनेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपने काँग्रेसमधून आयात केलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी द्यावी लागली. त्यामुळे शिवसैनिकांत नाराजी होती असे गोडबोले म्हणाले. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या विजयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सिहांचा वाटा आहे.
पक्ष आणि पक्षचिन्ह हिरावून घेतल्याचा बदला शिवसैनिकांनी शिंदेसेनेचा पराभव करून घेतला. आपला परंपरागत मतदारसंघ काँग्रेसला देऊन शिवसैनिकांनी मोठा त्याग केला आहे.
बाळासाहेबांची भूमिका
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना 23 किल्ले दिले होते. संकट डोक्यावर असल्यामुळे काही गोष्टींचा विचार करावा लागतो. रामटेकची जागा राजू पारवे यांना देण्यात आली. ही जागा नेहमीसाठी दिली आहे, असेसुद्धा समजू नका. काहीही झाले तरी रामटेक मतदारसंघ सोडणार नाही, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कार्यकर्ते सोबत असायला हवे. भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हणून निशाणा साधला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रामटेक मतदारसंघात राहतात. त्यांच्या घरावर पोचून आपण पराभव केला, असे सुद्धा देवेंद्र गोडबोले म्हणाले. धनुष्यबाण हा प्रभु श्री राम यांचा प्रतिक आहे. प्रभु रामचंद्र कधीच गद्दारांसोबत राहिले नाहीत. प्रभू रामचंद्र हे नेहमी इमानदार आणि निष्ठावान लोकांसोबत राहिले आहेत. असेही देवेंद्र गोडबोले म्हणाले.