Provocative Statement : रामगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील काही शहरातील वातावरण संवेदनशील बनले आहे. नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, वैजापूर येथे तणाव निर्माण झाला आहे. यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. रामगिरी महाराज आणि भाजप या दोघांवर त्यांनी प्रहार केला. ते म्हणाले, हे रामगिरी महाराज संत कुठे आहेत? भाजपने पोसलेले ते संत आहेत. संत मानवतेची शिकवण देतात. संत जातीय तणाव निर्माण करत नाहीत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळजीपूर्वक बोलण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर संबंधित समुदायाच्या लोकांनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर दोन जिल्ह्यांमध्ये खटले दाखल केले. नाशिकमधील येवला येथील रामगिरी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेत. पोलिसांनी सांगितले की, वैजापूर येथील एका स्थानिक व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या पोलिस सुरक्षा
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सुचनेनंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पोलिसांसह साध्या वेशातील सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. प्रवचनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रसने यावर टीका केली आहे. निवडणूक डोळ्यापुढे ठेवत हे प्रकार होत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
वडेट्टीवार म्हणाले, महायुतीला आपला पराभव दिसत आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती अनुकूल नसल्याने हे सर्व केले जात आहे. पण निवडणूक कितीही पुढे ढकलली तरी त्याचा फरक पडणार नाही. लोकांनी महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. सरकार लुटारू आहे. मतदार त्यांना धडा शिकवतीलच. तुम्ही काहीही करा. तुमचा पराभव निश्चित आहे. सुमारे दीडशे जागांवर काँग्रेस पुढे असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. विधानसभा निवडणुकीत विदर्भातून जास्तीत जास्त जागा काँग्रेस मागणार आहेत. विदर्भावर काँग्रेसचा हक्क आहे. तीनही पक्षांचे नेते एकत्रित बैठकीत मार्ग काढतील. काँग्रेसला जास्त जागा मिळतील, असे ते म्हणाले.