Assembly Election : निवडणुका झाल्यानंतर भाजपच्या बाजुने निकाल लागला की ईव्हीएमच्या बाबतीत ओरड होत असते. याचा अनुभव 2014 पासून सातत्याने येत आहे. पण, यंदा काही उमेदवारांनी आकडेवारी सांगून ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली आहे. महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या मुंबईतील नेत्यानंतर नागपुरातील एका उमेदवाराने देखील ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा दावा केला आहे.
मनसेच्या एका नेत्याने आपल्या कुटुंबात तीन मतदार आहेत. तरीही मतं मात्र दोनच मिळाली, असे सांगितले होते. विशेष म्हणजे तीन मतदारांमध्ये आई, पत्नी आणि त्यांचा स्वतःचा समावेश आहे. मग माझ्या घरातून किमान तीन मतं तरी मला मिळायला हवी, असं सांगत ईव्हीएमवर शंका व्यक्त केली होती. आता नागपुरातही एका उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या उमेदवाराने फेरमतमोजणीची मागणी केली आहे.
उत्तर नागपुरातील अपक्ष उमेदवार रमेश फुले यांनी हा दावा केला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबात 18 मतदार आहेत, पण फक्त दोनच मतं मिळाली, असा दावा केला आहे. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील 292 क्रमांकाच्या बुथवर आपल्या कुटुंबातील 18 मतं आहेत. पण मला फक्त दोनच मतं मिळाली आहेत, असं ते म्हणतात. भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप रमेश फुले यांनी केला आहे. ईव्हीएमद्वारे पुन्हा एकदा मतमोजणी करावी, जेणेकरून खरे मतदान आम्हाला कळेल, असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे तक्रार केली आहे. तसेच फेरमतमोजणीची मागणीही केली आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन
रमेश फुले यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त करतानाच पुन्हा एकदा ईव्हीएमद्वारेच मतमोजणी करावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांना बुथ क्रमांक 292 च्याच संदर्भात शंका आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आपल्या मागणीवर अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Nana Patole : निवडणूक आयोगाने दोन-चार किलोमीटरच्या रांगा दाखवाव्या !
भाजपवर आरोप
भाजपने लाडकी बहीण योजना पुढे केली, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ईव्हीएमचाच वापर केला. ईव्हीएमच्या माध्यमातून मतांचे ध्रुवीकरण केल्याचा आरोप फुले यांनी केला आहे. याच प्रकारामुळे अनेक उमेदवारांना शुन्य मते मिळाली आहेत, असेही ते म्हणतात.