महाराष्ट्र

Assembly Election : रामटेकमध्ये होणार बहुरंगी लढत!

Ramtek Constituency : जयस्वाल, मुळक, चौकसे, बरबटे, कारामोरे मैदानात

Politics : माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी आशीष जयस्वाल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात थेट भूमिका घेतली. त्यामुळे नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा रामटेक विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष वेधले जाण्यासाठी एक कारण मिळाले. त्यामुळे रामटेकच्या लढतीत जयस्वाल यांच्या विरोधात रेड्डींची बंडखोरी होईल आणि थेट सामना होईल, असे वाटले होते. मात्र आता 24 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यातील काहींचा स्वतंत्र मतदार आहे. त्यामुळे यावेळी रामटेकमध्ये बहुरंगी लढत होणार, हे निश्चित आहे.

जयस्वाल यांची लढत सोपी नाही

आशीष जयस्वाल या क्षेत्राचे चार टर्मचे आमदार आहेत. 2014 मध्ये मल्लिकार्जून रेड्डी यांनी त्यांचा पराभव केला, तो एकमेव अपवाद ठरला. यावेळी जयस्वाल पुन्हा एकदा रिंगणात आहेत. पण, यंदा त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. अर्थात 4 नोव्हेंबरपर्यंत कोण उमेदवारी मागे घेतो, त्याकडे लक्ष लागलेले आहे. मात्र, तुर्तास जे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत, त्यावरून तरी जयस्वाल यांच्यासाठी यंदाची लढत सोपी नाही, हे स्पष्ट आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघात यंदा 26 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील दोन छाननीनंतर बाद ठरले आहेत. आता 24 उमेदवार रिंगणात आहेत.

आशीष जयस्वाल यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली. त्यामुळे मल्लिकार्जून रेड्डी यांचा भाजपसाठी असलेला आग्रह संपुष्टात आला. निर्णय बदलविण्यासाठी त्यांनी नेत्यांवर दबाव टाकला, पण त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर रेड्डी बंडखोरी करतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही. उलट मुळचे काँग्रेसचे आणि आता अपक्ष लढणारे चंद्रपाल चौकसे यंदा वीस वर्षांनंतर रिंगणात उतरले आहेत. 2004 मध्ये त्यांनी 23904 मते घेतली होती. त्यावेळी पहिल्या क्रमांकावर असलेले आशीष जयस्वाल यांना 4115 तर दुसऱ्या क्रमांकावरील मधुकर किंमतकर यांना 27539 मते मिळाली होती. चौकसे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते होती. यंदा ते अपक्ष लढत आहेत.

दुसरीकडे राजेंद्र मुळक यांनी गेल्या आठ वर्षांपासून रामटेकमध्ये आपला जम बसवला आहे. मतदारसंघ ठाकरे गटाने ठेवल्यामुळे मुळक देखील अपक्ष लढत आहेत. मुळक यांच्याकडे काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. शिवाय त्यांनी वाढवलेल्या जनसंपर्काचाही त्यांना थोडाफार फायदा होईल, हे निश्चित आहे. मात्र, आदिवासी आणि अनुसूचित जातीचे उमेदवार बऱ्यापैकी रिंगणात असल्याने त्यांची मते विभागली जाणार आहेत. त्याचा मुळक यांना फटका बसू शकतो. बसपा, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी, राष्ट्रीय गोंडवाना पार्टी यांचाही मतदार मोठ्या प्रमाणात आहे.

संघाचे मोठे योगदान

रामटेकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम मोठ्या प्रमाणात आहे. 2014 मध्ये मल्लिकार्जून रेड्डी यांना निवडून आणण्यात संघाचे मोठे योगदान होते. मात्र, आता भाजपचा उमेदवार नसल्याने आशीष जयस्वाल यांना थेट फायदा होणार आहे. परंतु, एकेकाळी जयस्वाल यांचा खंदा कार्यकर्ता रमेश कारामोरे यांनी अडचण निर्माण केली आहे. 2019 च्या निवडणुकीत कारामोरे यांनी जवळपास 25000 मते घेतली होती. यंदा आशीष जयस्वाल (शिंदे गट), रमेश कारामोरे (प्रहार), विशाल बरबटे (ठाकरे गट) हे तिन्ही उमेदवार शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करतील. त्यामुळे यांच्यातही मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणे निश्चित आहे.

Nagpur : काँग्रेसमधून निलंबित उमेदवाराचे काय होणार?

4 नोव्हेंबरकडे लक्ष!

4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यादरम्यान कोण अर्ज मागे घेतो आणि कोण मैदानात कायम राहतो, हे कळणार आहे. महायुतीमध्ये बंडखोरी झालेली नसली तरीही रेड्डी शांत बसणार नाहीत, हे निश्चित आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुळकांनी बंडखोरी केली आहे. आता बंडखोर उमेदवार एक पाऊल मागे घेतात की पक्षाच्या तिकिटांवर अर्ज दाखल करणारे मागे हटतात, ते बघणे औत्सुक्याचे असेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!