Uddhav Thackeray : आपल्या शीघ्र कवितांमुळे चर्चेत असलेले रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बरसले. राज यांनी काही दिवसां अगोदर आठवले यांच्या मंत्रीपदावर भाष्य केले होते. यावरून नाराज झालेल्या आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत राज यांना सुनावले.
राज यांना आपला पक्ष बरखास्त करायची गरज नाही. त्यांनी आपला पक्ष वाढवावा, मीसुद्धा आपला पक्ष वाढवत राहील. परंतु त्यांनी सातत्याने आपली भूमिका बदलवू नये, अशा शब्दात रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदींसाठी भाजपला समर्थन देत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र ते स्वतंत्र लढत आहेत. बहुतांश मतदारसंघांमध्ये त्यांनी भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उतरवला आहे.
काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ‘रामदास आठवले यांच्याप्रमाणे मंत्रिपद मिळत असेल तर मी ते घेणार नाही. उलट माझा पक्षच बरखास्त करेल‘ अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यासंदर्भात आठवले यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रत्युत्तर दिले. निवडणुकीसंदर्भात बोलताना आठवले म्हणाले, ‘लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत वातावरण नाही. त्यावेळी विराेधकांनी संविधान धोक्यात आहे. आरक्षण संपणार, असा चुकीचा प्रचार केला होता. मात्र ज्याचा थोडाफार अभ्यास आहे त्याला पूर्ण कल्पना आहे की संविधान बदलले जाणार नाही.’
आरक्षण संपणार नाही
आपल्या देशात आरक्षण संपविले जाणार नाही. मात्र विरोधकांकडून अपप्रचार करण्यात येत आहे. भावनिक मुद्द्यांना खोट्याचा आधार देत विरोधक जनतेची दिशाभूल करत आहे. विरोधकांकडून मुस्लीम आणि दलित समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही आठवले यांनी यावेळी केला.
आठवलेंनाही धक्का
दोन आठवड्यांपूर्वी रामदास आठवले यांनाही त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी जोरदार धक्का दिला. आठवले यांचा अपमान होत आहे म्हणून आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही, असे रिपाइंचे राष्ट्रीय संघटक भूपेश थूल यांनी घोषित केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी पदाचा राजीनामा देत पक्षालाच रामराम ठोकला. त्यामुळे रामदास आठवले यांना विविध आरोपांचा सामना करावा लागत आहे.