शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला आहे. बांगलादेशातील हिंसक निदर्शनांदरम्यान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला. आता यावरूनच राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
शेट्टी म्हणाले, बांगलादेशपासून आपण काहीतरी शिकावं, आपल्या पंतप्रधानांना त्याप्रमाणे पळवून का लावू शकत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. राजू शेट्टी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी संवाद दौऱ्यावर असताना बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले.
विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राजू शेट्टी या सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अकोल्यातील मूर्तिजापूर येथे त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी राजू शेट्टी म्हणाले, मी विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांना आपलं मार्गदर्शन केलं. मात्र शेतकऱ्यांची मजबूत मतपेटी अद्यापही तयार झाली नाही. त्यामुळेच सरकार हे शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे. आमची आघाडी ही तिसरी का? पहिली का नाही असाही प्रश्न यावेळी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. दोन्हीही आघाडीतील नेते चार वर्ष नऊ महिने घरात बसतात आणि निवडणुकीच्या वेळेस बाहेर पडतात आणि आम्ही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी सतत लढत असतो. त्यामुळे आमची आघाडी तिसरी का? पहिली का नाही? असंही शेट्टी म्हणाले.
शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठांना एकत्र करण्याचा प्रयत्न मी करत आहे. सक्षम उमेदवाराला आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. यावेळी राजू शेट्टी यांनी केंद्रावर निशाणा साधला. सध्या मक्याच्या आयातीचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मक्याचे भाव सुद्धा आगामी काळात पडणार असा सूचक वक्तव्य ही राजू शेट्टी यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदींवर निशाणा!
राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ही निशाणा साधला ते म्हणाले की, बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काही तरी शिकायला पाहिजे. जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाला पळवून लावले असेल तर आपण असं का करू शकत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विचारला. बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांनी केलेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्या देश सोडून भारतात आल्या. त्याचाच संदर्भ देत राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.