देश / विदेश

PM Oath Ceremony : मोदी नंतर मोटाभाई नव्हे राजनाथ सिंह यांना शपथ

Rajnath Singh : गेल्या सरकारमध्ये होते संरक्षण मंत्री; उल्लेखनीय कामगिरी

National Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर कोण? याबाबत सकाळपासून चर्चा होती. शपथविधी सोहळ्यात एक अशी घटना घडली की सगळे चित्र समोर आले. यापूर्वीच्या मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांना यावेळी दुसऱ्या क्रमांकावर शपथ देण्यात आली आहे. मोदी यांच्यानंतर देशात नाव घेतले जाते ते अमित शाह यांचे. अमित शाह हे गेल्या सरकारमध्ये गृहमंत्री होते. सहाजिकच मोदी यांच्यानंतर ते शपथ घेतील असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही.

राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींनंतरचे दुसरे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अमित शहा यांनी शपथ घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

सलग तिसऱ्यांदा नेतृत्व

नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वात एनडीएचं ही सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते. दरवेळी समारंभात शपथ घेणाऱ्या नेत्यांना पुढच्या रांगेत बसवले जाते. या रांगेत पंतप्रधानपदाची शपथ घेणारा नेता पहिला असतो. त्यानंतर लगेचच राजनाथ सिंह बसून होते. त्यामुळे अमित शाह यांना यंदा कोणते मंत्रालय मिळणार अशी चर्चा होती.

असा होता ज्येष्ठता क्रम

मोदी यांच्यानंतर डाव्या हातावर असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या राजनाथ सिंह होते. त्यामुळे त्यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. अमित शहा आणि नितीन गडकरी अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर होते. याच रांगेत पाचव्या क्रमांकावर जे.पी. नड्डा आणि सहाव्या क्रमांकावर शिवराज सिंह चौहान होते. यावरून मंत्रिमंडळातील या मंत्र्यांची ज्येष्ठता ठरली आहे. निर्मला सीतारामन आणि एस. जयशंकर या रांगेत सातव्या व आठव्या क्रमांकावर होते. त्यानंतर मनोहर लाल खट्टर आणि जेडीएस नेते एच.डी. कुमारस्वामी दहाव्या क्रमांकावर होते. यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

PM Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांनी केली विक्रमाची बरोबरी

आश्चर्याचा धक्का

मोदी सरकारच्या बाबतीत नेहमीच मोदी-शाह यांचे सरकार असा उल्लेख केला जातो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह शपथ घेतील असे वाटत होते. परंतु मोदी-शाह या जोडीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शपथविधी सोहळ्यात अमित शाह यांचा दुसरा क्रमांक बदलून तिसरा करण्यात आला. राजनाथ सिंह यांची उत्तर प्रदेशच्या राजकारणावर पकड आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात झटका बसला आहे. त्यामुळे हा क्रम बदलून भाजपने कोणता संदेश दिला याबद्दल चर्चा सुरू आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!