Political war : मी सध्या काठावर आहे. मागेही जाऊ शकतो पुढेही जाऊ शकतो असे म्हणणारे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आता युटर्न घेतला आहे. त्यांनी बुधवारी सिंदखेडराजा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. दरम्यान डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना बुचकळ्यात टाकले आहे. डॉ. शिंगणे तुतारी हाती घेतील अशा बातम्या काही दिवसांपासून सुरू होत्या. कार्यकर्ता मेळाव्यात तशी घोषणा करतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा संभ्रम निर्माण केला आहे. त्यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, ‘मी या गटात गेलो, त्या गटात गेलो अशा बातम्या सुरू आहेत. मी सध्या इथच आहे. मी सुप्रिया सुळेंच्या गाडीत बसल्याच्या बातम्या सुरू होत्या. मीच ती बातमी टिव्हीवर पाहिली.’ विशेष म्हणजे शिंगणेंच्या मेळाव्यात पत्रकारांना प्रवेश नव्हता. पण सूत्रांकडून ही खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
सिंदखेडराजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा झाला. मेळाव्यात बोलताना ‘मी सध्या इथेच आहे’, असं ते स्पष्ट म्हणाले. अनेक लोक असे आहेत ज्यांना माझ्यामुळे रस्ता सापडत नाही. बाकिच्यांनी आपापले ठरवावे. मी माझ माझं बघून घेईल, असंही डॉ. शिंगणे म्हणाले आहेत.
‘मी अर्जून, मला कृष्णाची गरज आहे’
‘कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे. मी कशावरही उभा राहीलो तरी साथ द्याल का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीतून एक मुखी ‘हो’ असे उत्तर बाहेर पडले. सध्या माझी अवस्था महाभारतातल्या अर्जुनासारखी झाली आहे. मला कृष्णाची गरज आहे, अशी सादही त्यांनी घातली.
रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी
डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांनी आपापली मते व्यक्त केली. ‘शिंगणे साहेब घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल’, असा एकमुखी सूर कार्यकर्त्यांच्या भाषणातून उमटल्याचे सूत्रांनी सांगितले. “राम कृष्ण हरी वाजवा तुतारी” अशा घोषणाही काही उत्साही कार्यकर्त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
डॉ.शिंगणे माध्यमांशी बोलले..
कार्यक्रमानंतर डॉ. शिंगणे म्हणाले, ‘निवडणूक कशी लढावी यावर चर्चा झाली. अलीकडच्या दोन तीन महिन्यांत काही कार्यकर्ते भेटले. मी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी ९९ टक्के कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. एक दोन दिवसात जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊ. कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय घेऊ.’
मी शरद पवारांचा चाहता
मी शरद पवारांचा सच्चा चाहता आहे. अजित पवारांशी एक महिना झाले माझे बोलणे नाही. शरद पवारांची आणि माझी भेट अलीकडच्या काळात झाली नाही. मात्र जयंत पाटलांशी माझी भेट झाली असेही ते म्हणाले.