Rajendra Shingane : विधानसभेची निवडणूक महिनाभरावर आलेली आहे. अशात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शनिवारी (19 ऑक्टोबर) मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सिंदखेड राजा मतदारसंघातील आमदार राजेंद्र शिंगणे यांची पुन्हा घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसीने अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हाती तुतारी हाती घेतली. मागील काही दिवसांपासून डॉ. राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या संपर्कात असल्यांची चर्चा सुरू होती.
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शिंगणे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. राजेंद्र शिंगणे यांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शरद पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र वाचवण्याची गरज
“मी 1992-93 पासून शरद पवारांसोबत काम करत आहे. शरद पवारांमुळे मला राजकारणात, समाजकारणात मोठं होण्याची संधी मिळाली. अजित पवारांसोबत मी मधल्या काळात होतो. त्याचं कारणही मी वेळोवेळी सांगितलं आहे. जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळे बँक वाचवणे कठीण झालं असतं. त्यामुळे बँक वाचवण्यासाठी मी अजित पवारांसोबत राहिलो. परंतु महाराष्ट्राची आज जी परिस्थिती आहे. महाराष्ट्र वाचवण्याची आज गरज आहे. शरद पवारच हे काम करु शकतात, यावर मला विश्वास आहे. त्यामुळे मी माझ्या मूळ पक्षात परतलो आहे.”, असं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार गटाची टीका
राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षांतराच्या भूमिकेनंतर अजित पवार गटाचे आमदार मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांना तिकीट मिळणार ते अजितदादांसोबत आहेत. ज्यांना अजित पवारांनी तिकीट नाकारलंय ते इकडे तिकडे हुडकायचं काम करत आहेत. “आम्ही निष्ठावंत म्हणून सोबत राहिलो असताना यांना प्रवेश देऊन तिकीट द्यायचं ठरवलंय”, असं स्वतः राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी म्हटल्याचंही अमोल मिटकरी यांनी सांगितलं.