Congress : नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचे तारणहार आपणच आहोत, असे समजणारे माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांच्यावर टीका केली. त्यानंतर काँग्रेसने मुळकांना बाहेरचा रस्ता दाखवला. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमधील बंडखोरीला चालना देणाऱ्या केदारांचे पाय मात्र ‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या’ मोकळेच आहेत.
असा झाला रामटेकचा गड ताब्यात
सुनील केदार यांनी गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला. श्यामकुमार बर्वेंसारख्या नवख्या उमेदवाराला निवडून आणण्यात मोठे योगदान दिले. महाराष्ट्रात सलग दहा वर्षे काँग्रेसचा एकच खासदार होता. लोकसभेत 13 खासदार झाले. त्यातील एकाचा विजय केदारांमुळे शक्य झाला. त्याचाच लाभ घेत जिल्ह्यातील जागावाटपात त्यांचा हस्तक्षेप वाढला. पण नागपूर ग्रामीणमधील उमरेड, सावनेर आणि कामठी हे तीनच मतदारसंघ काँग्रेसला मिळाले. मुळकांना रामटेक, हिंगणादेखील हवे होते. त्यासाठी त्यांनी जंग पछाडली.
रामटेकमधून राजेंद्र मुळक यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण रामटेक आणि दक्षिण नागपूरच्या वाटाघाटीत काँग्रेसकडे दक्षिण नागपूर आले आणि उद्धव यांना रामटेक मिळाले. तेथून ठाकरे गटाने विशाल बरबटेंना उमेदवारी दिली. राजेंद्र मुळक यांना घेऊन केदार मातोश्रीवर पोहोचले. पण यश आले नाही. अखेर ‘सुनील केदार आणि श्यामकुमार बर्वे यांच्या मार्गदर्शनात’ मुळक यांनी बंडखोरी केली. अपक्ष उमेदवारी दाखल केली. अर्ज दाखल करताना बर्वेदेखील त्यांच्यासोबत होते.
बंडखोरांनी तलवार म्यान करावी, असे आवाहन काँग्रेसने केले, पण मुळकांना कुणी संपर्कच साधला नाही. त्यामुळे त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. केदार त्यांच्या पाठिशी आहेत, हेही जाहीर आहे. मुळक यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराला अडचण होईल, हे निश्चित आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांनी ‘मुळकांवर कारवाई का नाही?’ असा सवाल केला. सुनील केदार यांच्यावरही जाहीर टीका केली. दुसऱ्याच दिवशी मुळकांचे निलंबन झाले. पण ही परिस्थिती निर्माण करणारे सुनील केदार यांच्यावर कारवाई कधी होईल, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा… गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा’ या सुरेश भटांच्या ओळी केदार यांना तंतोतंत लागू होतात, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
हिंगण्यातही हस्तक्षेप
हिंगणा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला बोढारे यांना उमेदवारी मिळावी म्हणून केदार यांनी फिल्डिंग लावली. मात्र, शरद पवारांनी रमेश बंग यांना आणखी एक संधी दिली. त्यामुळे ‘सुनील केदार आणि श्यामकुमार बर्वे यांच्या मार्गदरश्नात’ बोढारेंनी बंडखोरी केली. अपक्ष अर्ज दाखल केला. त्यानंतरही बंग उमेदवारी रद्द व्हावी म्हणून खूप प्रयत्न झाले. ‘बोढारेंनी अर्ज मागे घ्यावा, मी पण घेतो’ असे सांगत दुसऱ्याचेच नाव सूचवले. बंग यांनी टाकलेल्या अटींनुसार बोढारेंनी अर्ज मागे घेतला. पण बंग मात्र अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचलेच नाहीत. बोढारेंचे बंड व्यर्थ गेले. मात्र, त्यांचे नाव सूचवून काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीतही बंडखोर तयार करणारे केदार आता कुठे आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.