महाराष्ट्र

Nagpur constituency : राजेंद्र मुळक यांचं भवितव्य कधी ठरणार?

Assembly Election : हिंगण्यासाठी नाव चर्चेत; अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस

Rajendra mulak : नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक अस्वस्थ काँग्रेस नेत्यांमध्ये सध्या राजेंद्र मुळक आघाडीवर आहेत. एकेकाळी राज्याच्या मंत्रीमंडळात महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळणारे मुळक सध्या मतदारसंघाच्या शोधात आहेत. रामटेकची दावेदारी संपुष्टात आल्यामुळे आता ते हिंगणा मतदारसंघातून लढण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी चर्चा आहे. त्यांच्या भवितव्याचा निकाल कधी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 काँग्रेसची जागा

विधानसभा निवडणुकीसाठी 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. सोमवार आणि मंगळवार असे दोनच दिवस हाती आहेत. अशात भाजप आणि काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये सस्पेंस कायम ठेवला आहे. पण, नागपूर जिल्ह्याचा पेच संपविण्यात महाविकास आघाडीनेच आघाडी घेतली आहे, हेही तेवढेच खरे. अद्याप हिंगण्याचाच प्रश्न कायम आहे. हा मतदारसंघ तसा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे यंदाही शरद पवार गटाचाच उमेदवार राहील हे निश्चित आहे. मात्र, राजेंद्र मुळक यांच्या निमित्ताने हा मतदारसंघ काँग्रेसकडे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजेंद्र मुळक यांनी रामटेकमधून लढण्याची तयारी केली होती. पण, महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेत बरेच दिवस वाद चालला. अखेर ही जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली. शिवसेनेचे विशाल बरबटे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मुळक निराश झाले. त्यानंतर त्यांनी सुनिल केदार यांच्यासोबत मातोश्री गाठले. उद्धव यांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अपयश आले. अखेर मुळक यांनी रामटेकचा विषय बाजुला ठेवला.

अशात त्यांना निवडणूक लढवायची असेल तर सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल. अन्यथा भाजपमध्ये प्रवेश करून पश्चिम नागपूरसारखा मतदारसंघ मागावा लागेल. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी चर्चाही उठल्या होत्या. मुळक भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवतील, अशी बातमी प्रकाशित झाली. त्यावर मुळक यांनी स्पष्टीकरण देत आपण कधीही काँग्रेस सोडणार नाही, असं सांगितलं. मात्र, सद्याची नागपूर जिल्ह्याची परिस्थिती बघता त्यांच्यापुढे असाही एक पर्याय उपलब्ध असल्याचे बोलले जाते.

Assembly Election : पश्चिम नागपुरात भाजपचं चाललयं काय?

आमदार, मंत्री आणि नंतर?

राजेंद्र मुळक 2004 मध्ये पहिल्यांदा उमरेडमधून विजयी झाले. मात्र, 2009 मध्ये अनुसुचित जातीसाठी हा मतदारसंघ आरक्षित करण्यात आला. त्यानंतर ते विधानपरिषदेवर गेले. पुढे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते नऊ खात्यांचे राज्यमंत्री होते. सर्वाधिक सक्रीय मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. 2014 मध्ये ते कामठी मतदारसंघातून बावनकुळेंच्या विरोधात लढले आणि पराभूत झाले. त्यानंतर भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं आणि त्यांनी रामटेकच्या दिशेने मोर्चा वळवला. पण जवळपास दहा वर्षे प्रतीक्षा करूनही रामटेकमध्ये त्यांच्या वाट्याला निराशाच आली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!