Independent Candidates : सत्तेच्या राजकारणात विदर्भासारखा महत्त्वाचा प्रदेश आपल्याच बाजूने राहावा, असा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो, पण सध्याच्या एकूण खिचडी वातावरणात हा प्रदेश नेमका कोणाला बळ देणार, हा औत्सुक्याचा विषय आहे.
तसे पाहिले तर मुळात विदर्भ हा काँग्रेसचा परंपरागत गढ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मस्थान नागपुरात असले, तरी निवडणुकीच्या राजकारणात त्याचा फायदा हिंदुत्ववादी पक्षांना पूर्वी फारसा झाला नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे संघाच्या जन्मभूमीत लोकप्रतिनिधी मात्र काँग्रेसचेच निवडून यायचे. पण आता ही परिस्थिती राहिली नाही. संघ विचाराच्या भाजपने येथे हळूहळू पाय पसरले आणि काँग्रेसला या हक्काच्या गढापासून दूर सारले. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असे दिग्गज पहिल्या टप्प्यात विदर्भात येऊन गेले आहेत.
काँग्रेसचे उमेदवार
एक काळ असा होता की अपवाद वगळता विदर्भातील बहुतांश जागा येथील मतदार काँग्रेसच्याच पदरात टाकत होता. पण आज यवतमाळ सारख्या मोठ्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. ही परिस्थिती कशी बदलता येईल, यादृष्टीने काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या सर्वांचेच मतदारसंघ विदर्भात आहेत. विशेष म्हणजे भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षांचे प्रदेश प्रमुख विदर्भातले आहेत. त्यामुळे आपल्या प्रदेशातून आपल्या पक्षाला कशा जास्तीत जागा मिळवून देता येईल यासाठी बावनकुळे अणि पटोले दोघेही जीवाचे रान करीत आहेत.
2019 च्या निवडणुकीत सर्वाधिक 29 जागा भाजपाला मिळाल्या होत्या. शिवसेनेला 4 व काँग्रेसला 15, राष्ट्रवादी 6, प्रहार 2 आणि 6 अपक्ष आमदार येथून निवडून आले होते. यंदा तसेच चित्र राहील अशी परिस्थिती नाही. कारण गेल्या पाच वर्षात पुलाखालून इतके पाणी वाहून गेले आहे की, राज्यातील सारी राजकीय समीकरणे पार बदलून गेली आहेत. 2019 मध्ये जे एकमेकांविरोधात लढत होते, त्यातील काही आता एकमेकांच्या सोबत आहेत. त्यामुळे बंडखोरीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. विदर्भात 25 मतदारसंघात बंडखोरी आहे. त्यातील 15 बंडखोर महायुतीतील तर महाविकास आघाडीतील 20 बंडखोर आहेत. हे बंडखोर अनेकांचे राजकीय गणित बिघडवू शकतात.
भाजपचे उमेदवार
आर्वी मतदारसंघात यावेळी भाजपने विद्यमान आमदार दादाराव केचे यांना तिकीट न देता फडणवीस यांचे निकटचे सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या केचे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. रामटेकमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, काटोलमध्ये स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे सरचिटणीस याज्ञवल्क्य जिचकार, अहेरीत अंबरीश आत्राम, आरमोरीत काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम, हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) राजू तिमांडे, अमरावतीत भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता, बडनेरा येथे भाजप नेते तुषार भारतीय, शिवसेना (उबाठा) प्रीतीबंड, रिसोडमध्ये माजी खासदार अंनतराव देशमुख, उमरखेडमध्ये माजी आमदार राजेंद्र नगरधने यांनी आपापल्या पक्षनेतृत्वाचे बीपी वाढविले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे तर वडील आणि मुलगी यांच्यात संघर्ष होत आहे. अशी लढत महाराष्ट्राने यापूर्वी पाहिली नाही. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा हे राष्ट्रवादी (अजित दादा) या पक्षाकडून उभे आहेत, तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम रिंगणात आहेत. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी स्थानिक भाजप नेत्यांची इच्छा होती. ती पूर्ण झाली नाही व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तो मतदारसंघ गेला. त्यामुळे नाराज झालेले अंबरीश आत्राम यांनी भाजपमध्ये बंडखोरी करून उमेदवारी दाखल केली आहे.
पवार यांच्या पक्षात
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे अजित पवारांना पासून फारकत घेऊन शरद पवारांच्या पक्षात गेले. त्यांच्या विरोधात त्यांची पुतणी गायत्री शिंगणे अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे. विदर्भातील ही बंडखोरीची लागण पाहता हा प्रदेश नेमका कोणाच्या बाजूने किती प्रमाणात राहतो, याची उत्सुकता साऱ्यांना आहे.