महाराष्ट्र

Lok Sabha Election : अमरावती कोणी केली काँग्रेस विरोधात उमेदवारी दाखल?

Rajendra Gawai : मित्रपक्षांना संपविण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप

RPI Vs Congress : अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या विविध राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. अशातच वर्षानुवर्षे काँग्रेस सोबत काम करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने काँग्रेसवर टीका करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय गोटात अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे प्रमुख राजेंद्र गवई यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

‘द लोकहीत’ सोबत बोलताना राजेंद्र गवई म्हणाले की, काँग्रेस व महाविकास आघाडीचा घटक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने अनेक वर्षे पडतीच्या काळात काँग्रेसला साथ दिली. देगलूर, कोल्हापूर, सोलापूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये रिपाइं राहुल गांधी, आदित्य ठाकरे, नाना पटोले यांच्यासोबत दिवसरात्र एक करून अनेक सभा घेतल्या उमेदवारांना विजयी केले. मात्र काँग्रेसने आपल्यासोबत दगाफटका केला. अमरावतीत दुसरा उमेदवार दिल्याचे नमूद करीत डॉ. राजेंद्र गवई यांनी नाराजी व्यक्त केली.

Lok Sabha Election : ‘वंचित’ने केली विभागीय आयुक्तांची तक्रार, कारण..

दादासाहेब गवई यांच्या काळातील इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांची काँग्रेस ही मित्र पक्षांना बळ देणारी होती. आता मात्र चित्र बदलले आहे. महाविकास आघाडीमध्ये भूमिका निभावत चांगले काम केले असतानासुद्धा ऐन वेळेवर उमेदवारी नाकारण्यात आली आहे. आपण सतत सर सर किंवा मॅडम मॅडम करीत नाही म्हणून ही उमेदवारी नाकारण्यात आल्याचे लक्षात आले आहे, असे गवई म्हणाले. काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीच्यावतीने देण्यात आलेल्या उमेदवार हा समाजासाठी झटत नाही. त्यामुळे आम्ही त्याला मतदान करणार नाही त्याऐवजी आम्ही आमची उमेदवारी जाहीर करत आहोत, असे राजेंद्र गवई म्हणाले.

मोटरसायकल रॅली काढत गवई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोक्षमोक्ष लागेपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्याचे राजेंद्र गवई यांनी सांगितले. पूर्वी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असलेले बळवंतराव वानखडे यांना काँग्रेसच्यावतीने उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काँग्रेसच्या विरोधात उमेदवार देत काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. काँग्रेस आणि रिपाइंमधील हा वाद आता शिगेला पोहोचला असून पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेतात? यावर मतदारांचे लक्ष लागून आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!