Buldhana district : अक्षय तृतियेला घट मांडणी झाली होती. वाघ बंधूंनी शनिवारी सकाळी मांडणीचे निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार राजा स्थिर म्हणजे पंतप्रधान मोदी यांना धोका नाही.हा महत्त्वाचा निष्कर्ष आहे. तसेच पीक,पाणी समाधानकारक राहील असे दिसते.
भेंडवळ भविष्यावर राज्यातील सामान्यांसोबतच शेतकर्यांचे लक्ष असते. यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार, राज्यात साधारण पाऊस असेल आणि पिकेही साधारण असतील. यंदाही अवकाळी पाऊस, पुराचा धोका कायम असेल. देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचं संकट असेल. सध्या आचार संहिता असल्याने देशाच्या राजा म्हणजेच पंतप्रधानाबाबत प्रत्यक्ष भाष्य करणे टाळले असले तरी राजाचे प्रतीक असलेला पानविडा कायम असल्याचे जाहीर करण्यात आले. म्हणजेच देशाचा राजा कायम राहणार आहे. बुलढाणा आणि आजुबाजूच्या गावातील मंडळी भेंडवळ भविष्यवाणी ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित होती.
जून मध्ये कमी स्वरूपाचा पाऊस
जून महिन्यात पाऊस कमी तर जुलै मध्ये साधारण पाऊस होणार आहे. ऑगस्टमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस होईल. तर सप्टेंबर महिन्यात यंदा दमदार पाऊस असेल. भेंडवळच्या मांडणीची भाकीत असे असले तरी यंदा भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस होणार असा हवामान विभागाचा अंदाज आहे. अतिवृष्टी होऊन महापुराचा धोका आहे. पाऊस दमदार बरसण्याची शक्यता असल्याने यंदा जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. असे हवामान विभागाने आधीच जाहीर केलेले आहे.
पीक स्थिती समाधानकारक
पिकांबाबत ज्वारी, तूर, गहू, कापूस, सोयाबीन पिके कमी अधिक येतील.काही ठिकाणी पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल. पण चारा टंचाई भासू शकते. यावर्षी पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तीची शक्यता नाही. याशिवाय आर्थिक संकट, संरक्षण खात्यावर ताण, घुसखोरीची शक्यता यंदा कमीच वर्तविली आहे.
वाघ कुटुंबीयांकडून घट मांडणी
दरवर्षी अक्षयतृतियेला सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतामध्ये वाघ घराण्याचे वंशज घटाची मांडणी करतात. या घटामध्ये 18 धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा टाकतात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा खणून पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतिक असलेली 4 मातीची ढेकळे ठेवतात. त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडई, तर खाली विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन प्रतिकात्मक मांडणीची प्रथा आहे.
दुसर्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटात झालेल्या बदलावरुन भविष्य जाहीर केले जाते. पुरी हे पृथ्वीचं, घागर हे समुद्राचं प्रतिक असतं. तर त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांची मांडणी असते. घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन आगामी वर्षासाठी भाकित सांगण्याची जुनी परंपरा आहे.
भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणती भाकितं ?
राजा कायम आहे, आर्थिक स्थिती चांगली राहील, परकीयांचा त्रास यावर्षी राहणार नाही. पाऊस कमी अधिक राहील. अवकाळी पावसाचा प्रभाव जास्त असेल. पिके सारण राहतील परंतु नासाडी होण्याची शक्यता आहे. रोगराईचे संकट येईल.
विविध पिकांची स्थिती
अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग मोघम राहतील.
उडीद साधारण, तीळ चांगले, भादली पिकावर रोगराइ राहील, बाजरी, मठ : साधारण, साळी चांगले, जवस,
लाख साधारण, गहू, हरभरा चांगला, करडी साधारण
तर मसूर मोघम राहण्याची शक्यता आहे.