Political War लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी 9 जून रविवारी संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अशात राज ठाकरेंनी त्यांच्या चाहत्या कार्यकर्त्यांसाठी समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर केली आहे.
राष्ट्रपती भवनातील शपथविधीच्या सोहळ्याला 7 देशांच्या नेत्यांशिवाय देशातील सिनेतारकही उपस्थित होते. यात रजनीकांत, अक्षय कुमार, शाहरुख खान, विक्रांत मेस्सी आणि राजकुमार हिरानी यांचा समावेश होता. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे देखील शपथविधी सोहळ्यात होते.
नेमकी काय आहे पोस्ट..
राज ठाकरे यांनी एक खास पोस्ट समाज माध्यमांवर त्यांच्या चाहत्या कार्यकर्त्यांसाठी दिली आहे. 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो, यानिमित्ताने राज्यातील त्यांचे अनेक कार्यकर्ते आणि चाहता वर्ग त्यांना शुभेच्छा देतात. राज ठाकरे यांचे चाहते मिठाई वाटून, त्यांची भेट घेऊन त्यांना गुलदस्ते इत्यादी देऊन वाढदिवस साजरा करतात. अनेक ठिकाणी त्यांचे चाहते वाढदिवसानिमित्त केक कापून मनातील भावना व्यक्त करतात. परंतु आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी, असे करू नका हे आवाहन केले आहे . समाज माध्यमांवर पोस्ट करत कोणतीही भेटवस्तू आणू नका ही विनंती केली आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र, असे म्हणत त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे.
बिनशर्त पाठिंबा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला “बिनशर्त पाठिंबा” जाहीर केला होता. मुंबईच्या शिवाजी पार्कवरून गुढीपाडव्याच्या रॅलीला संबोधित करताना ठाकरे यांनी मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. “मला राज्यसभा किंवा विधानसभा नको, मी फडणवीसांना सांगितले. मी त्यांना म्हणालो, माझ्या कोणत्याही अपेक्षा नाहीत आणि कोणत्याही अटी नाहीत. मोदी, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे,” असे राज ठाकरे म्हणाले होते.
Nana Patole : निगेटिव्ह मार्क असूनही सगळेच कसे पास झाले ‘नीट’
एवढे करूनही राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्यात निमंत्रण न दिले नसल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनीही शपथ घेतली. मोदींसह 58 मंत्र्यांनी शपथ घेतली. सरकारमध्ये मोदींसोबत 72 मंत्री असतील. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार मंत्री आहेत. यात 36 राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. अशात राज ठाकरे यांना निमंत्रण नसल्याने कार्यकर्ते आणि चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शपथविधी सोहळा पूर्ण झाल्यावर राज ठाकरे यांची कुठलीही प्रतिक्रिया न आल्याने चर्चेला आणखी उधाण मिळाले.