महाराष्ट्र

Bhandara : राज ठाकरे पोहोचले मुलींच्या वस्तिगृहात

Raj Thackeray : ‘संकटात असाल तर थेट फोन करा’, मुलींना दिला खासगी मोबाईल नंबर

Badlapur Cases : बदलापूरच्या घटनेनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली आहे. यातच राज ठाकरे साकोली येथील मुलींच्या वसतीगृहात पोहोचले. आणि त्यांनी मुलींना आपला खासगी मोबाईल नंबर दिला. ‘कधीही अडचण भासली किंवा संकटात आहोत असे वाटले तर थेट फोन करा. मी तुमच्यासाठी धावून येईल,’ असा विश्वास राज यांनी मुलींना दिला. राजकीय दौऱ्यात असताना राज यांनी आपल्या कृतीतून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तर वसतीगृहातील मुलींची मने जिंकली. 

साकोली येथील मुलींच्या वसतीगृहात पोहोचून त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी केली. त्यांच्या या अचानक दौऱ्याने वसतीगृह प्रशासनाची एकच धावपळ झाली. या भेटीदरम्यान त्यांनी मुलींशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी आपला खासगी मोबाईल नंबर वसतीगृहातील मुलींना दिला. आणि काही समस्या असल्यास थेट फोन करण्याचे आवाहनही केले.

बदलापूरमधील शाळेत चार आणि सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेमुळे राज्यभरात सध्या संतापाचा आगडोंब उसळला आहे. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. हिच बाब हेरुन विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी (21 ऑगस्ट) भंडारा जिल्हाच्या साकोली येथील मुलीच्या वसतीगृहात गेले. हे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह आहे. मुलींशी संवाद साधत वसतीगृह सुरक्षित आहे की नाही, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही याची विचारपूस केली. मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी मुलींशी नियमित संवाद साधण्यास सांगितले.

ट्विट द्वारे सरकारला सुनावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले. बदलापूर अत्याचाराच्या घटनेवर राज ठाकरे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ‘बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणालो होतो. या घटनेच्या संदर्भात कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली. विषय लावून धरला आणि त्यातून जन आक्रोशाला तोंड फुटलं,’ असं राज ठाकरे म्हणाले.

Bombay High Court : बदलापूर पोलिसांना चांगलेच फटकारले 

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अत्याचार

‘ठाणे हा मुळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. याच जिल्ह्यात जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे. पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये. दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं पहिलं कर्तव्य नाही का?,’ असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!