प्रत्येक निवडणुकीत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर एक पाऊल पुढे जाऊन महाराष्ट्राचा दौरा देखील सुरू केला आहे. सध्या ‘मराठा आंदोलनाची भूमि’ म्हणून ज्या मराठवाड्याकडे सध्या बघितले जात आहे, त्याठिकाणी राज ठाकरे दौरा करीत आहेत. बुधवारी (दि.७) रात्री ते नांदेडमध्ये दाखल होणार आहेत.
राज यांनी ४ अॉगस्टपासूनच महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्यात मराठवाड्याला सर्वांत पहिले प्राधान्य दिले आहे. विशेषत्वाने मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी ते आले असल्याचे बोलले जात आहे. सोलापूर आणि धाराशीव आटोपून सध्या ते लातूरमध्ये आहेत आणि आज (बुधवार, दि.७) रात्री नांदेडमध्ये दाखल होतील. गुरुवारी (दि.८) ते नांदेडमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत.
राज ठाकरे यांनी अलीकडेच शिवडी आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवारही निश्चित केले. शिवडी येथून बाळ नांदगांवकर तर पंढरपूर येथून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास २५० विधानसभा जागा लढविण्याची घोषणा राज ठाकरे यांनी आधीच केली आहे. त्यादृष्टीने त्यांनी त्या त्या भागातील दमदार उमेदवार निश्चित करण्याची तयारी सुरू केली आहे. नांदेडनंतर ते हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी देखील जाणार आहेत.
ठाकरे-जरांगे सामना बघायला मिळणार?
राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले होते. आरक्षणातील त्यांना काही कळतं का? चिल्लर म्हणा आणि सोडून द्या, अशी खोचक टीका केली होती. राज यांच्याकडून त्या टीकेची फारशी दखल घेतली गेली नाही. पण आता ते स्वतः मराठवाड्याच्या दौऱ्यात असल्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगण्याची पुन्हा एकदा शक्यता वर्तवली जात आहे.
धाराशीवमध्ये गोंधळ
मराठवाडा दौरा सुरू केल्यानंतर राज ठाकरे धाराशीवमध्ये पोहोचले होते. त्यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद त्याठिकाणी बघायला मिळाले. धाराशीवमध्ये ते ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते तिथे मराठा आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. राज यांनी आरक्षणाच्या संदर्भात योग्य भूमिका मांडावी, अशी मागणी करत आंदोलकांनी हॉटेलमध्ये शिरकाव केला होता.