Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. आयोगाने सर्वच पक्षांना निवडणुकीच्या रूळांवर धावण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळं राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग आला आहे. अशात मनसेच्या इंजिननं फलाट सोडण्यापूर्वीची पहिली शिटीही वाजवलेली नाही. लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपच्या गाडीचा वेग वाढविण्यासाठी आपलं इंजिन तिकडं जोडलं होते. परंतु आता राज ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचे इंजिन फलाटावर येऊन उभं आहे. परंतु ही एक्सप्रेस ओढणाऱ्या उमेदवार नावाच्या डब्यांचं अद्याप ठरलेलं नाही.
इंजिनपासून कोणता डबा कुठं असेल हे रेल्वेचं नियोजन ठरलेलं असते. जनरल डबा, स्लीपर क्लास, फर्स्ट एसी वैगरे अशी डब्यांची श्रेणी असते. अगदी त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मतदारसंघांशी रचना असते. काही मतदारसंघात प्रचंड जोर लावावा लागतो. काही मतदारसंघात सहज विजय शक्य असतो. पण यासाठी उमेदवार कोण आहे, हे ठरणं गरजेचं असतं. मात्र अद्याप ठाकरे यांनी हे चित्र पक्षात अस्पष्ट ठेवलं आहे. अलीकडेच ठाकरे यांनी राज्यभरातील काही भागांचा दौरा केला. काही ठिकाणी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. परंतु त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यामुळे ठाकरे यांनी नावं जाहीर करणं थांबविलं.
अखेरच्या क्षणाची प्रतीक्षा
राज ठाकरे हे महायुतीसोबत यावे असे अनेक प्रयत्न झालेत. मात्र त्यांनी स्वबळाचा नारा दिला. निवडणुकीनंतर ते महायुतीसोबत सत्तेत सहभागी होणार का, याबाबतही अस्पष्टता आहे. पण अद्याप त्यांनी एकाही उमेदवाराला ‘आदेश’ न दिल्यानं ‘साहेबांच्या मनात चाललंय तरी काय?’ असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला आहे. उमेदवारीचं कन्फर्म तिकिट कोणाला मिळणार असं आता कार्यकर्त्यांना वाटत आहे. सद्य:स्थितीत राज्यभरातील मनसे इच्छुक ‘वेटिंग लिस्ट’वर आहेत. राज ठाकरे आणि त्यांचे जवळचे काही सहकारी नावांवर चर्चा करीत असल्याची माहिती आहे.
राज ठाकरे सध्या जबाबदार ‘लोको पायलट’प्रमाणे इंजिन आणि एकूणच गाडीच्या सुस्थितीची खात्री करीत आहेत. त्यामुळे उमेदवारांची नावं जाहीर झाल्यानंतर संभाव्य बंडखोरीवी ‘व्हॅक्युम ब्रेक’ लागतो की नाही हे तपासत आहे. उमेदवारी न मिळाल्यानं सुरुवातीला काही लोक प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. पण ऐनवेळी पडद्यामागून साथ सोडतात. त्यामुळं गाडी निघाल्यानंतर अचानक कोणी ‘चेन पुलिंग’ करणार नाही, याची काळजीही राज ठाकरे घेत आहेत.
शंकाच नाही
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला रेकॉर्डतोड गर्दी होते यात शंकाच नाही. ठाकरे सगळ्याच बाबतीत टीआरपी आहेत, हे देखील सत्य. ठाकरेंनी उच्चारलेला प्रत्येक शब्द सामान्याला विचार करायला लावतो ही देखील वस्तुस्थिती आहे. पण सभेला होणाऱ्या गर्दीचं अद्यापही मतांमध्ये रुपांतर होत नाही, ही बाब नाकारून चालणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र मनसे एक्सप्रेस चालविणाऱ्या राज ठाकरे यांनी आपलं इंजिन आणि त्यामागील डबे कोणत्या ‘डेस्टिनेशन स्टेशन’वर लावायचे हे ठरविलेलं नाही. महाविकास आघाडीच्या ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’वर राज ठाकरे सुरुवातीपासूनच जाण्यास इच्छुक नव्हते. अशात निवडणुकीनंतर ते महायुतीच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जातात का, हे बघण्यासारखे राहणार आहे.