Vidarbha Visit : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू आहे. 23 ऑगस्टला सायंकाळी वर्धा जिल्ह्यात असताना राज ठाकरे यांनी मनसैनिकांशी संवाद साधला. पक्षातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी विजयाचा कानमंत्र दिला. महिलांना सभागृहामध्ये मागे बसलेलं बघून ठाकरेंनी महिला मागे का बसल्या आहेत? आपल्या घरातील स्त्री मागे बसलेली आपल्याला चालेल का? असे विचारून राज यांनी महिलांना सन्मान दिला पाहिजे, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
राज यांनी दटावल्यानंतर सभागृहातील महिलांना पुढे बसविण्यात आले. ‘राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांना जोर आला आहे. तुमच्या वर्ध्यात जर अशी घृणास्पद घटना घडली, तर त्याला तेथेच ठेचून काढा. तशी खूणगाठच मनाशी बांधा,’ असेही राज म्हणाले.
ही विनोबा भावे यांची भूमी..
राज ठाकरे पुढे म्हणाले की, ‘गुन्हेगारी वाढत जाणे हे चांगले लक्षण नाही. संघटना मजबूत करण्यासाठी आत्तापासून कामाला लागा. नुसता उत्साह काहीही कामाचा नसतो. ही विनोबा भावे यांची भूमी आहे. खरे तर वर्ध्यातील जनतेला संघटन बांधणीबद्दल सांगायलाच नको. आतापर्यंत संघटनशक्ती भक्कम असायला पाहिजे होती. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. काही महिन्यांत निवडणूक जाहीर होणार आहे. वर्ध्यात निवडणूक लढवायची की नाही, येथून उमेदवार कोण, हे मी नंतर जाहीर करेन.’
निवडणुकीचे अनेक चटके आणि फटकेसुद्धा मी खाल्ले आहेत. कोण कशासाठी निवडणूक लढत आहे, हे मी बघितले. अनेकांना निवडणुकीचे तिकीट म्हणजे फक्त पैसे कमविण्याचा मार्ग वाटतो. पक्षाच्या हरल्याने किंवा जिंकल्याने त्यांना काहीच फरक पडत नाही. परंतु आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असे होऊ नये. पक्षातील प्रत्येक सहकाऱ्यास मित्र मानायला हवे. रोज एकमेकांची भेट घेऊन संवाद साधायला हवा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
महाराष्ट्रातील राजकारणाचा जो चिखल मागील पाच वर्षांत झाला आहे, तो प्रत्येकाने बघितला आहे. जनता अत्यंत त्रस्त झाली आहे. मागील पाच वर्षांत महाराष्ट्र नासवून ठेवला आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. परंतू विधानसभेच्या वेळी लोकं वेगळा विचार करतात. जनतेला जर आपला पर्याय खणखणीत दिसला, तर राज्यातील जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत आणणार. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. जनतेशी संवाद साधला तर मनसेचे यश निश्चित आहे, असे राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.