MNS : पोलिसांच्या निष्क्रयतेमुळे गुन्हे घडत आहेत, असे कुणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. यात खरी मेख म्हणजे सत्ताधाऱ्यांनी पोलिसांचे हात बांधून ठेवले आहेत. पोलिसांना कोण गुन्हेगार आहे? हे माहीत आहे. मात्र कारवाई केल्यावर सत्ताधारी त्याच पोलिसांवर कारवाई करतात. मला सत्ता द्या, 48 तासात पोलिसांचे हात मोकळे करतो. मग बघा गुंडगिरी कशी संपुष्टात येते, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
राज्यातील पोलीस गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकूश ठेवण्यात सक्षम आहेत. त्यांना कोण गुन्हेगार आहे, हे देखील माहीत आहे. मात्र त्यांचे हात सत्ताधाऱ्यांनी बांधून ठेवले. आधीचे आणि आत्ताचेही सत्ताधारी सारखेच आहेत. गुन्हेगारांवर कारवाई केल्यास त्याच पोलिसांना घरी बसावे लागते. माझ्या हातात सत्ता आल्यास आधी पोलिसांचे हात 48 तासात मोकळे करेन. मग बघा पोलीस काय असतो, असेही राज म्हणाले.
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यस्तरीय दौरा सुरू केला. विदर्भ दौऱ्याची सुरुवात त्यांनी गोंदियातून केली. गोंदियातील ग्रँड सीता हॉटेलमध्ये बुधवारी (दि. 21) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पक्षाचे युवा सेनाप्रमुख अमित ठाकरे, जिल्हा संयोजक अम्बेडवार, जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे, हेमंत लिल्हारे, जिल्हा संघटक रीतेश गर्ग आणि पदाधिकारी उपस्थित होते.
अत्याचारात राजकारण
‘बदलापूर येथील घटनेनंतर राजकारण सुरू आहे. हे प्रकरण मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी पुढे आणले. आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम करतो. तिकीट कुणाला द्यायचे हे महिनाभरानंतर कळणार आहे. सुपारी घेऊन तिकीट वाटप केले जाणार असेल, तर मग पक्षातील सुपारीबाजांना कसे बाजूला सारायचे? त्यामुळे पक्षबांधणीसाठी मला महिनाभर द्या,’ अशा कानपिचक्या त्यांनी घेतल्या.
Maharashtra Strike : बंद बेकायदेशीर; कोणालाही त्याचा हक्क नाही
राज ठाकरे रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांचा जंगी रोड शो शहरातून काढण्यात आला. बंद असून देखील या रोड शो आणि सभेला हजारो मनसे सैनिकांची हजेरी होती. दूसरीकडे राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्या दरम्यान विदर्भातील दोन उमेदवार त्यांनी निश्चित केले. मराठवाडयातील चार व विदर्भातील दोन असे सहा उमेदवार मनसेने जाहीर केले आहेत.