प्रशासन

Bhandara-Gondia : आमदाराच्या राईस मिलवर धाड; प्रकरण रफादफा

Suspicious Action : ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी कारवाई

Rice Mill : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात असलेल्या एका आमदाराच्या राईस मिलवर सोमवारी (ता. 23) रात्री दहाच्या सुमारास अचानक छापा पडला. अधिकाऱ्यांचे हे पथक अचानक या भागामध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी थेट संबंधित आमदाराची राईस मिल गाठली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कागद काळे करण्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती संबंधित आमदाराला मिळाल्यानंतर त्यांना आपल्या ‘घड्याळी’मध्ये वाईट वाईट सुरू होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने राईस मिलचा परिसर गाठला.

अधिकाऱ्यांना पाहिल्यानंतर आमदार साहेब चांगलेच गोरेमोरे झाले. आमदार असल्याने सुरुवातीला त्यांनी आपल्या सत्तेची ‘पावर’ वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर आमदार साहेबांना आपला खिसा रिकामा करावाच लागला. अधिकाऱ्यांच्या पथकाने पकडलेल्या तीन ट्रकच्या बदल्यात आमदारांनी अधिकाऱ्यांना भरपेट ‘खाऊ’ घातले. आपली भूक मिटल्यानंतर राईस मिलवर छापा मारण्यासाठी आलेले हे पथक माघारी फिरले.

नेमके काय होते?

ज्या राईस मिलवर हा छापा मारण्यात आला तेथे बरेच घबाड होते. ‘द लोकहित’ला मिळालेल्या माहितीनुसार या राईस मिल मध्ये परराज्यामधील धान देखील होते. इतकेच नव्हे तर रेशन योजनेमधील धान्याचा साठाही या राईस मिलमध्ये सापडल्याची माहिती आहे. रात्रीच्या अंधारात दहा वाजताच्या सुमारास पडलेली ही धाड अधिकाऱ्यांवर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा झाल्यामुळे अंधारात गुडूप झाली. त्यानंतर सर्व व्यवस्थित असल्याची खात्री केल्यानंतर हे आमदार महोदय घराकडे निघाले.

पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धान घोटाळा झाला आहे. या घान घोटाळ्याची पाळेमुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून निघतात. पण त्याच्या बऱ्याचशा फांद्या मुंबईतील मंत्रालयापर्यंतही पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे धान्याच्या घोटाळ्यातील तपासातून आजपर्यंत काय निष्पन्न झाले हे सर्व जगालाच माहिती आहे. अशाच प्रकारचे घबाड सोमवारी रात्री देखील अधिकाऱ्यांच्या हाती लागले होते. परंतु लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा विरोधकांना आयता लाभ मिळू नये याची काळजी संबंधित आमदाराने घेतली.

अधिकाऱ्यांना धाक दाखवत बसलो असतो किंवा वाद घातला असता तर प्रकरण वाढले असते. या घोटाळ्याची वाच्यता सर्वत्र झाली असती. त्यातून विरोधकांना आयते कोलीत मिळाले असते. त्यामुळे अधिकाऱ्यांना काय केव्हाही पाहून घेता येते, असा विचार करीत संबंधित आमदारांने आपली तिजोरी तातडीने खाली केल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांची हे पथक भंडारा- गोंदिया जिल्ह्यात पोहोचले कसे? त्यानंतर त्यांना माहिती मिळाली कशी? हा प्रश्न सध्या संबंधित आमदाराला सतावत आहे. अधिकाऱ्यांचे हे पथक आले कुठून आणि गेले कुठे, याचे उत्तर अनेकांना आहे.

Ricemill News : जिल्हाधिकाऱ्याचा कारवाईचा बडगा: 34 राईस मिलर्सला बजावल्या नोटीस..

ट्रक गायब केले

लक्ष्मी आणि कुबेराच्या जोरावर दबलेले हे प्रकरण पुन्हा डोके वर काढणार नाही, याची काळजी सध्या हे आमदार साहेब घेत आहे. अधिकारी राईस मिल मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पकडलेले तीन ट्रक देखील आमदार साहेबांनी ‘दहा वाजून दहा मिनिटांची वेळ’ पहात गायब केले आहेत. भविष्यात अधिकाऱ्यांच्या हाती राईस मिल मधून काहीही लागणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना आमदारांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

error: Content is protected !!