महाराष्ट्र

Maharashtra : राहुल नार्वेकर यांचेवर स्तुतीसुमनांचा वर्षाव !

Rahul Narvekar : सत्ताधारी पक्षाचे विरोधकांना चिमटे.

या लेखात प्रकाशित झालेली मते ही लेखकांची आहे. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही

Assembly : प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्यकर्तृत्वाने, स्वभावाने, वागणुकीने ओळखला जातो. अशा व्यक्तींविषयी प्रत्येकाला आदर वाटतो. मोठ्या पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तींना तर डोके शांत ठेवून संयमाने वाटचाल करावी लागते.‌ विधानसभा अध्यक्षपदी असलेली व्यक्ती त्याच तोलामोलाची असणे आवश्यक असते. राहुल नार्वेकर हे या सर्व निकषांत गुणवत्ता मिळवून पास झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष पदावर सलग दुसऱ्यांदा त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या एकमताने झालेल्या निवडीचे सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी स्वागत केले आहे. अभिनंदन ठरावावर बोलताना त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली. याचवेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संधी साधून विरोधी पक्षांना आरसा दाखविण्याचा खुबीने प्रयत्न केला.

महायुती

विधीमंडळ अधिवेशनात महायुती सरकारने बहुमत सिध्द केले. नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड एकमताने झाली. या पदासाठी अन्य कोणीही अर्ज दाखल केला नव्हता. सभागृहात शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे सदस्य अनुपस्थित होते. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाने शिवसेनेतील फूट अधिकृत झाली. हा राग उध्दव ठाकरे गटाच्या मनात अजून खदखदत आहे. राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. यापूर्वी हा मान बाळासाहेब भारदे यांना मिळाला होता.

सोन्यासारखा कोकण पुत्र..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. मी पुन्हा येईन असे राहुल नार्वेकर म्हणाले नव्हते तरीही ते विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा आले याचा आनंद आहे. यासाठी खरेतर नाना पटोले यांचे आभार मानायला हवेत. त्यांनी वाट मोकळी केली त्यामुळे मागच्या वेळेस राहुल नार्वेकर अध्यक्ष बनू शकले. अशी मिश्किल टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. विधानसभेत येण्यापूर्वी त्यांनी विधान परिषदेत आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. कायद्यातील बारकावे शोधून त्यावर बोट ठेवण्याचे काम ते करायचे. कायदे मंडळाच्या अध्यक्षांना असे बारकावे माहीत असणे महत्त्वाचे आहे. मात्र आपले कर्तव्य पार पाडत असताना काहींनी त्यांच्यावर पातळी सोडून टीका केली. त्यांनी या टीकेकडे लक्ष दिले नाही. शांतपणे आपले कर्तव्य बजावले. एक प्रकारे अग्नीपरिक्षेला त्यांना सामोरे जावे लागले. आगीतून बाहेर आलेला कोकणपुत्र सोन्यासारखा आहे, हे सिद्ध झाल्याचे ते म्हणाले.

जनतेच्या वतीने अभिनंदन..

यापुढील काळात नार्वेकर यांच्या मार्गदर्शनात सभागृहात व्यापक जनहिताचे निर्णय होतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, यांची उंची राखत सर्व सदस्यांना न्याय देण्याची भूमिका अध्यक्ष नार्वेकर यांनी मागील अडीच वर्षांत पार पाडली आहे. मी विधानसभेचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्यावतीने त्यांचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.

सभागृहात हास्य फुलले..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साध्या सोप्या शब्दांत विरोधी पक्षांवर मार्मिक निशाणा साधला. रामदास आठवले स्टाईलने काही काव्य ओळी म्हणून दाखवल्या. ‘कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर’ या ओळींनी सभागृहात हास्य फुलले. ‘सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, योग्य न्याय देतील अध्यक्ष’ अशी कोटीही त्यांनी केली. राहुल नार्वेकर या़च्या निवडीचे त्यांनी अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांनी त्यांच्यावर होणारी टीका सहन केली. ते डगमगले नाही. कोणाचीही तमा बाळगता त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीवर निर्णय दिले. त्यांनी राम शास्त्री प्रभुणे यांच्यासारखा न्याय दिला. विश्वप्रवक्ते , भोंगे त्यांच्यावर पातळी सोडून टीका करत होते. पण नार्वेकर दबले नाहीत याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.

विरोधकांना घेतले चिमटे..

लोकांच्या मनात काय आहे हे तुम्हाला कळलेच नाही. परिणामतः बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाहीत. नाना पटोले 208 म्हणजे थोडक्यात बचावले, असे मिश्कीलपणे शिंदे म्हणाले. लोकभावनेची दिशा तुम्हाला कळली असती तर आज ही दशा तुमच्यावर आली नसती, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला. विधानसभेत राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन ठरावावर भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लोकांनी तुम्हाला नाकारले आहे, हे वास्तव स्वीकारण्याचे आवाहन केले. जेव्हा तुम्हाला विजय मिळाला तेव्हा तुम्हाला ईव्हीएम आठवले नाही का, असा मार्मिक सवालही केला. चुकीची आकडेवारी करून विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विरोधकांची स्टंटबाजी..

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएमला दोष देऊन नसता बोभाटा करणा-या विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत खडेबोल सुनावले. लोकसभेत आम्ही कमी पडलो तेव्हा रडत बसलो नाही. तुम्हीवि धानसभेत हरलात तर रडीचा डाव खेळताय, असा टोला त्यांनी हाणला. विरोधक नुसती स्टंटबाजी करीत आहेत. त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. असेही त्यांनी सांगितले.

राहुल नार्वेकर यांच्या निवडीचे दादांनी स्वागत केले. पक्षफुटी नंतरच्या काळात विरोधकांनी राहुल नार्वेकर यांच्यावर तालतंत्र सोडून टीका केली. पण संयम राखून त्यांनी ऐतिहासिक निर्णय दिला. हे सांगायला अजित दादा विसरले नाहीत. लोकसभा निवडणूक जिंकले तेव्हा ‘गार गार वाटायचे’ आता गार वाटते की गरम, हे तुमचे तुम्ही ठरवा. लाडक्या बहिणींनी आम्हाला इथे बसवले आहे, हे लक्षात असू द्या, हे सांगायला ते विसरले नाहीत.

जयंत पाटील यांनी उधळली स्तुतीसुमने..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. देवेंद्रजी विरोधी पक्षांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांचे जयंत पाटील यांनी स्वागत केले.

राहुल नार्वेकर यांचे कौतुक करताना ते म्हणाले नार्वेकर यांनी हे पद स्वतःच्या कर्तबगारीने मिळवले आहे. त्यांनी उत्तमप्रकारे सभागृहाची काळजी घेतली आहे. अडीच वर्षे आपल्याला कोर्ट म्हणून काम करावे लागले. तुम्ही उत्तम सहकार्य केले. आपल्या बोलण्यात, शरीर भाषेत दुजा भाव दिसला नाही. संयमी असे काम केले.

BJP Politics : ‘याद कर सिकंदर के हौसले तो आली थे..’

पक्षफुटी संदर्भात तुम्ही असा निकाल दिला की सर्वोच्च न्यायालयाला त्यावर निकाल देता आला नाही. तुमचा निकाल मान्य करून आमचा नवीन डाव सुरू झाला आहे. जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांची वारेमप स्तुती केली. यावरून ते भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या दोघांनीही कायद्याचे शिक्षण घेतले आहे. दोघेही वकील आहेत. एकंदरीत राज्याचा कारभार जनतेची वकीली करणा-या नेत्यांच्या हातात आला आहे, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!