Bhandara Gondiya Constituency : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील प्रचारात आता कुठे रंगत वाढायला लागली आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात हेवीवेट नेत्यांनी सभांचा महाशंखनाद केला आहे.6 एप्रिल रोजी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तर काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 13 एप्रिल रोजी साकोली येथे प्रचारसभा ठरली आहे. आता हेवीवेट नेत्यांच्या प्रचारसभांनी प्रचाराचा अधिक रंगत आली आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी आतापर्यंत प्रचारात फारशी रंगत आली नव्हती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती झाली नव्हती. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मागील तीन चार दिवसांपासून घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. भाजपचे उमेदवार खासदार सुनील मेंढे यांनी दोन दिवसांपूर्वी गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत प्रचार कार्यालय सुरू करून प्रचाराचा नारळ फोडला. तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात प्रचारसभांना सुरुवात केली आहे. त्यामुळे ते प्रचारात पुढे दिसून येत आहेत. तर महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) खा. प्रफुल्ल पटेल यांच्या गुरुवारपासून (दि. 4) पुढील चार दिवस प्रचारसभा होणार आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आ. रोहित पवार यांची मंगळवारी सडक अर्जुनी येथे सभा होत आहे. तर पुढील तीन चार दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांच्या सभा होणार असल्याची माहिती आहे.हेवीवेट नेत्यांच्या या सभांच्या आयोजनामुळे पोलिस यंत्रणेवरचा ताण आता वाढणार आहे. साकोली आणि गोंदियात होणाऱ्या सभेसाठी उसळणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिस विभाग नियोजन करीत आहे.या सर्व घड़मोडित भंडारा- गोंदिया जिल्ह्यात खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे