महाराष्ट्र

Balasaheb Thorat : आरक्षण बंदबाबत न बोलताही आंदोलन कशासाठी?

Congress : विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचा भाजपला सवाल

Protest By BJP : राहुल गांधी हे आरक्षण बंद करणार असे बोललेच नाही. त्यानंतरही भाजप आंदोलन करीत आहे. त्यामुळे भाजपचे आंदोलन नेमके कशासाठी आहे, असा सवाल विधिमंडळातील काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीतील भाजपचे माजी आमदार तरविंदरसिंह मारवा यांनी ही धमकी दिली आहे. मारवा यांना पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले. काँग्रेसने भाजपचा निषेध केला. तरविंदसिंह मारवा यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

भाजप विरोधात घोषणाबाजी

मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आझाद मैदान येथे शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यात भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वर्षा गायकवाड यांनी भाजपावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी तरविंदसिंह मारवांच्या विधानावर भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली. नागपूरमध्ये (Nagpur) व्हरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

सरकारचा निषेध

नागपुरात भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्यासह शेकडो महिलांनी नारेबाजी करून रस्ता रोको केला. पोलिसांनी यावेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नाशिक (Nashik) शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात निदर्शने करण्यात आली. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्यावतीने भाजपचा निषेध करण्यात आला. राज्यातील इतर भागातही काँग्रेसने आंदोलन करून भाजपचा धिक्कार केला.

Arvind Kejriwal : 177 दिवसांनंतर केजरीवाल सुटले; अकोल्यात जल्लोष

फेक नॅरेटिव्हला जनता भुलणार नाही

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात भाजपच्या आंदोलनावर ट्वीट करत म्हणाले की, आरक्षण बंद करणार, असे खासदार राहुल गांधी कधीही बोलले नाहीत. त्यामुळे भाजपावाले नेमके कशासाठी आंदोलन करत आहेत? भाजपा स्वत:च फेक न्यूज पसरवून आंदोलनाची नौटंकी करत आहे. भाजपचे (BJP) नेते सत्यता पडताळून पाहण्याची तसदीही घेत नाहीत. त्यांना अज्ञानात आनंद घेण्याची सवय लागली आहे. भाजपच्या या ‘फेक नॅरेटिव्ह’ला जनता भुलणार नाही. भाजपच संविधान आणि आरक्षणविरोधी आहे, हे सत्य जनतेला माहित आहे, असे थोरात म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole), विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या धमकीचा निषेध केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!