Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख आता जवळ येत आहे. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला जात आहे. आता काँग्रेस देखील बुधवारी (6 नोव्हेंबर) आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. नागपूर आतील संविधान सन्मान परिषद आटोपल्यानंतर आता राहुल गांधी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले आहेत. मुंबईमध्ये राहुल गांधी हे काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करणार आहे.
लाडकी बहिणीची रक्कम वाढली काय?
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेतून सध्या महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये टाकण्यात येत आहेत. आता ही रक्कम दोन हजार रुपयांवर नेण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने देखील महिलांसाठी अशाच प्रकारची योजना आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केली आहे. याशिवाय बेरोजगारांसाठी दोन वर्षांपर्यंत पाच हजार रुपये रक्कम देण्याची ग्वाही देखील वंचित बहुजन आघाडीने दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय असेल, याची उत्सुकता सर्वांना आहे.
आरक्षण आणि जनगणना
सुरुवातीपासूनच काँग्रेस जातनिहाय जनगणनेवर जोर देत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा सरकार आल्यास काँग्रेस या जनगणनेसाठी प्रयत्न करेल असं वचन जाहीरनाम्यात दिलं जाऊ शकते. मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षण मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. या विषयाचा समावेशही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नक्की असू शकतो. निवडणुकीपूर्वी महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरत आहे. त्याच पद्धतीची किंवा त्याहीपेक्षा लोकप्रिय योजना काँग्रेसला आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करावी लागणार आहे. महिलांचे मत वळवण्यासाठी ही योजना जाहीरनाम्यात घेणे महाविकास आघाडी साठी गरजेचे झाले आहे.
संविधान बचावनंतर आरक्षण बचाव हा मुद्दा वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुकीत मुख्य केला आहे. नागपूरच्या संविधान सभेतही राहुल गांधी यांनी संविधान आणि आरक्षण याच विषयावर भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या दोन मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश असेल असं मानलं जात आहे. याशिवाय राहुल गांधी सातत्याने बेरोजगारी आणि उद्योग यावर बोलत असतात.
Rahul Gandhi : दीक्षाभूमीत संविधानकारापुढं राहुल गांधी नतमस्तक
उद्योग पळविले
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करतात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या हातून प्रकाशित होणाऱ्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात तरुणाईसाठी कोणती ऑफर असणार याची प्रतीक्षा सर्वांना आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला यश मिळालं. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीतील समीकरण पूर्णतः संमिश्र राहणार आहे. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल का? याबद्दल शंका व्यक्त होत आहे. आपल्या जाहीरनाम्यात कोण किती आकर्षक योजना मतदारांपुढे मांडतो, यावर पक्षांचे भविष्य अवलंबून राहणार आहे.