BJP Politics : गेल्या अनेक महिन्यांपासून अकोल्यातून गायब असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता आपले जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष असल्याची नाट्य प्रदर्शन केले आहे. ‘द लोकहित’ने यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या डोळ्यात अंजन घालणारे वृत्त प्रकाशित केले होते. राधाकृष्ण विखे पाटील हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु ते केवळ ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्येच आहेत. ही वस्तुस्थिती सर्वप्रथम ‘द लोकहित’ने मांडली. ‘द लोकहित’चे हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर निद्रावस्थेत असलेला विरोधी पक्षही खडबडून जागा झाला.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
पालकमंत्री हरविल्याची जाणीव काँग्रेला झाली. त्यामुळे काँग्रेसने पालकमंत्री हरविले आहेत, अशी पोस्टबाजी केली. टीका होऊ लागल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर पांघरूण झाल्यासाठी शुक्रवारी (ता. 28) नाट्यमय पत्रव्यवहार केला.
पालकमंत्री झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील अकोल्यात आले. त्यानंतर त्यांनी अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजेश्वर मंदिरात पूजन केले. मंदिराला शंभर कोटी रुपयांच्या निधीची घोषणा त्यांनी करून टाकली. परंतु घोषणा केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना शंभर कोटी रुपयांचा विसर पडला. त्यानंतर अनेकदा विखे पाटील यांनी अकोल्याचा धावता दौरा केला. ‘ऑनलाईन चॅटिंग’ करतात तशी एक बैठकही घेतली. परंतु त्यांना ‘द लोकहित’ने वृत्त प्रकाशित करेपर्यंत शंभर कोटी रुपयांची घोषणा केली होती हे आठवलेच नाही.
Akola Congress : ‘द लोकहित’च्या बातमीनंतर पालकमंत्र्यांबाबत पोस्टरबाजी
दुसरीकडे काँग्रेसनेही त्यांच्या दुर्लक्षपणाबद्दल व्यापक प्रचार सुरू केला. लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपचा दारूण पेक्षाही अतिदारूण पराभव झाला आहे. लवकरच विधानसभा निवडणूक होत आहे. अशात आपला नाकर्तेपणा आणि जिल्ह्याकडे दुर्लक्ष शेकणार नाही याची जाणीव पालकमंत्र्यांना झाली. त्यातून त्यांनी तातडीने पत्रव्यवहाराचा देखावा तयार केला.
तारीख तर बघा साहेब
राधाकृष्ण विखे पाटील यांनी 28 जून 2024 म्हणजे शुक्रवारी गिरीश महाजन यांना पत्र दिले. पत्रात राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाजन यांना म्हटले आहे की, अकोला पूर्ण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांना गुरुवारी म्हणजेच 27 जून 2024 रोजी एक पत्र पाठवले. त्यात राजेश्वर मंदिराच्या ‘मेकओव्हर’साठी 100 कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे हा निधी तातडीने मंजूर करावा.
हाच तातडीचा शब्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना फार पूर्वी सूचना असता तर त्याचा अकोल्याला फायदा झाला असता. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात अनेक योजनांची घोषणा झाली. पालकमंत्र्यांनी हेच पत्र अकोल्यात घोषणा केल्यानंतर तातडीने दिले असते तर कदाचित शुक्रवारच्या अर्थसंकल्पात अजितदादांनी अकोल्यासाठी थोडा खिसा ढिला केला असता. परंतु दुर्दैवाने पाटील यांना राजेश्वर मंदिराचा मुद्दाही महत्वाचा वाटला नाही.
चूक तुमची नाहीच
मुळात या प्रकाराबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांची चूक आहे असे म्हणताच येणार आहे. पालकमंत्रिपदाबाबत अकोल्याचे नशिबच खराब आहे, असेच म्हणावे लागेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही बच्चू कडू हे ‘इम्पोर्टेड’ पालकमंत्री अकोल्याला मिळाले होते. अगदी शेजारी असलेल्या अमरावती जिल्ह्यातून अकोल्यात यायला बच्चू कडू यांना मुहूर्त मिळत नव्हता. प्रसार माध्यमांनी यासंदर्भात बातम्यांमधून ‘झोडायमायसिन’ औषधोपचार केल्यानंतर बच्चू कडू अकोल्यात आलेत. त्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये ‘स्टिंग ऑपरेशन’ वैगरे प्रकार केले. अगदी तसाच प्रकार आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत घडला आहे. पाटील हे मुळातच विदर्भातील नाहीत. त्यामुळे त्यांना अकोल्याच्या वेदना काय आहे, हे पूर्णपणे कळेलच अशी अपेक्षाच ठेवणे चुकीचे आहे. खरं तर हे सरकारलाच कळायला हवे होते. परंतु दुर्दैवाने ते अद्यापही कळलेले नाही.
भाग्य केव्हा फळफळणार?
अकोल्याला चांगला, दमदार, जोमाने काम करणाऱ्या पालकमंत्र्यांची गरज आहे. जो मंत्रालयात ठाण मांडून बसेल. अकोला जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या योजना खेचून आणेल. राज्य आणि केंद्रातूनही भरघोस निधी आणण्याची ताकद त्याच्यात असेल. पण दुर्दैवाने अकोल्याच्या नशिबात असे नेतृत्व दिसत नाही. त्यामुळे अनेक महिने झाले तरी किल्ला चौक ते बाळापूर नाका हा रस्ता अपूर्ण आहे. त्यामुळेच भीमनगर चौकातील अवघे 21 खड्डेही बुजत नाहीत. त्यामुळेच अकोल्यात विजेचा खेळखंडोबा थांबत नाही. त्यामुळेच स्थानिक नेत्यांना कोणत्याही कामासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या पाया पडावे लागते. यावरून विदर्भाच्या बाबतीत त्याच विशेषत: पश्चिम विदर्भाच्या बाबतीत सरकार किती गंभीर आहे, याची एकूण कल्पना येते. अशात पुन्हा या भागाने सत्ताधाऱ्यांना फटका दिला तर आश्चर्य वाटू नये असेच चित्र आहे.