आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपकडून बंद लिफाफ्यामधून उमेदवार निश्चित केला जाणार आहे. तर आजपासून कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. मंगळवारपासून कॉंग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून मतदारसंघातील प्रत्येक इच्छूकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात देखील केली आहे. एकट्या काँग्रेस कडे आतापर्यंत १ हजार ६८८ इच्छूकांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली आहे.
याचा अहवाल १० ऑक्टोबरपर्यंत दिला जाणार आहे. यामध्ये विदर्भातील बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात इच्छुक असलेल्या उम्मेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते नाना गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी दि. १ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली असून हे नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेत असून आपला अहवाल देणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस पक्षाकडे एकूण १६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये एकूण सात विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये जळगाव जामोद, खामगाव, मलकापूर, बुलढाणा, चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा यांचा समावेश आहे. पक्षनिरीक्षक नाना गावंडे हे येत्या दोन दिवसात जिल्ह्याच्या ठिकाणी बैठक घेऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या नेत्यांकडे दिली राज्याची जबाबदारी
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक अश्या प्रकारे पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यामध्ये विदर्भासाठी आरिफ नसीम खान,अभिजीत वंजारी, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, वसंत पुरके, डॉ नामदेव किरसान,आणि नाना गावंडे यांचा समावेश आहे. तर उत्तर महाराष्ट्र साठी शिवाजीराव मोघे, के. सी. पाडवी. कुणाल पाटील, मुजफ्फर हुसेन, कोकण विभागासाठी सुरेश शेट्टी, चंद्रकांत धांडोरे आणि हुसेन दलवाई यांचा समावेश आहे. तर मराठवाड्यासाठी एम एम शेख, कल्याण काळे, यशोमती ठाकूर, शोभा बच्छाव, विश्वजीत कदम पश्चिम महाराष्ट्रासाठी अमित देशमुख पृथ्वीराज चव्हाण आणि प्रणिती शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून पूर्ण मुंबईसाठी संग्राम तुपे आणि सतीश पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते दिनांक १ ते ८ ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतील व १० ऑक्टोंबर पर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश कॉंग्रेसला सादर करतील.