Akola District : राज्यात तापमानाने कहर केला आहे. अकोल्यात पारा 45 अंशावर गेला. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात कलम 144 लागू केली आहे. दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ त्रासदायक ठरते आहे. तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर दिला जातो. त्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च या वृक्षारोपण योजनेवर करते. परंतु लावण्यात आलेल्या वृक्षांचं नेमकं काय होत असेल. कारण आतापर्यंत वृक्ष लागवड योजनेतून लावण्यात आलेले किती वृक्ष जगले आणि ही योजना किती यशस्वी झाली असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पारा दिवसेंदिवस वाढतो
तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. उष्माघाताचे बळी ही जात आहेत. याचं कारण कमी होत जाणारे वृक्षांचे प्रमाण. त्यातून निर्माण होणारी जागतिक तापमानात वाढ, प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यभरात कोट्यवधी वृक्ष लागवड करण्यात येते. सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र, कोट्यवधी वृक्ष लावून काय होते? असा प्रश्न सर्वांना पडला. तुम्हाला एक कथा माहित असेल. ‘सकाळी पाहुण्यांनी वृक्ष लागवड केली. दुपारी या झाडाला पाणी दिले. सायंकाळी हे झाड बकरीने खाल्ले आणि रात्री तीच बकरी पाहुण्यांनी खाल्ली” अशीच काहीशी अवस्था वृक्ष लागवड योजनेची झाली असेल. अशा चर्चाही आता सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.
वृक्ष संगोपनाचे काय
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन गाजावाजा केला जातो. दोन कोटी वृक्ष लागवड योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत राज्यभरात सर्वत्र वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आले. मात्र वृक्षाचे संवर्धन संगोपन न झाल्यामुळे या योजनेचा बट्ट्याबोळ झाला.
राज्यातून जिल्ह्यात जिल्ह्यातून प्रत्येक तालुकास्तरावर राबवलेल्या या योजने अंतर्गत तालुक्यात प्रत्येक शाळा, ग्राम पंचायत शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, महाविद्यालयांनी वृक्षारोपण करुन झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले. परंतु दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता मात्र अनेक ठिकाणी झालेली नाही. तर अनेक ठिकाणी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात झाले मात्र, हे वृक्ष जगलेत का? याचे संवर्धन होत आहे का, याची दखल कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वृक्षाराेपणानंतर त्यांच्या संरक्षणासाठी कटघरे उभारण्यात आली मात्र त्यांचीही अवस्था बिकट झाली.
तापमान कमी करणार कसे
वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. मात्र केवळ वृक्षारोपण करण्यापुरता देखावाच होतो. पुढे झाडे किती जगतात याची आकडेवारी समोर येतच नाही. देशासह राज्यात वाढत जाणारे तापमान चिंतेची बाब बनली आहे. वृक्षारोपणाच्या काही योजना अद्यापही कागदावर आणि फोटो पुरत्याच उरल्या आहेत. खरी गरज आहे ती प्रत्येकाने पुढाकार घेण्याची सर्वांनी संकल्प करून किमान एक तरी झाड लावा, नुसते वृक्षारोपण करून फायदा होणार नाही तर ते जगवा. त्याचं संगोपन करा. तरच येणाऱ्या भविष्यात आपण या धोक्याला कमी करू शकू.