Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीतील दमदार यशानंतर महाविकास आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण विधानसभा निवडणुका लागताच आघाडीतील पक्षच एकमेकांवर उड्या मारायला लागले आहेत. दक्षिण मध्ये ठाकरे गटाने काँग्रेसचे टेंशन वाढवले आहे. यातून बाहेर पडता नाकीनऊ येत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीनेही पूर्वसाठी आग्रह धरला आहे. एवढी वर्षे निवडणुका लढताहेत, काय दिवे लावले? असा सवाल शरद पवार गटाने केला आहे.
नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नाही
नागपूर शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. एकाही मतदारसंघात आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरला नाही. किमना पक्षाच्या चिन्हावर तर उतरलाच नाही. सुरुवातीपासून काँग्रेससोबत आघाडी असल्यामुळे राष्ट्रवादीने कायम एक पाऊल मागे ठेवले. किंवा राष्ट्रवादीचा कधी विचारच झाला नाही. एकेकाळी नागपुरातील बहुतांश मतदारसंघांत काँग्रेसचा दबदबा होता. त्यामुळे काही मतदारसंघ भाजपकडे गेल्यावरही विरोधात काँग्रेसचाच उमेदवार राहिला आहे. राष्ट्रवादीने प्रयत्न केलेही असतील, तरीही दावा काँग्रेसचाच राहिला आहे. पण आता महाविकास आघाडी नावाचे नवे गणीत अस्तित्वात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फ्रंट फुटवर आहे.
विशेषतः काँग्रेसचा गड असलेल्या पूर्व नागपुरात गेल्या तीन निवडणुका भाजपचे कृष्णा खोपडे निवडून येत आहेत. त्यांचा आता या मतदारसंघात चांगलाच दबदबा आहे. लोकसभा निवडणुकीत गडकरींना सर्वाधिक 75 हजारांचे मताधिक्य खोपडेंच्याच मतदारसंघात होते. याशिवाय पूर्व नागपूरचा चेहरामोहरा गडकरींनी बदलला असला, तरीही त्याचे श्रेय ते खोपडेंनाच जाहीरपणे देतात. त्यामुळे विधानसभा त्यांच्यासाठी फार अवघड नाही.
यामध्ये महाविकास आघाडीत शरद पवार गटाचे दुखणे काँग्रेसोबत आहे. खोपडेंच्या विरोधात लढून एकदाही यश आलं नाही. मग आता तरी पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादीसाठी सोडावी, असा आग्रह धरला जात आहे. एकदा आम्हाला संधी देऊन बघा. आम्ही खोपडेंना टक्कर देऊ शकतो, असा दावा शरद पवार गटाचे नेते करू लागले आहेत.
किती दिवस लहान भावाची भूमिका?
राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक मतदारसंघात काँग्रेससाठी लहान भावाचीच भूमिका बजावत आला आहे. पण असे किती दिवस चालणार आहे? आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारासाठी जीवाचं रान केलं. तरीही विधानसभेत एकाही जागेसाठी आमच्या नावाचा विचार होऊ नये, हे दुर्दैवी आहे, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आता पूर्वमध्येही राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एखादा नेता बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.