Congress : उपराजधानीच्या विकासासाठी शेकडो कोटींनी निधी येतो. मोठमोठाल्या कामांची घोषणा होते. पण तरीही दोन तासाच्या पावसाने अख्ख्या शहराचे हाल होतता. लोकांच्या घरात पाणी शिरतं, रस्ते तुडुंब होतात. नागपूरसाठी निधी येतो तर मग तो जातो कुठे, असा थेट सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
उपराजधानी नागपूरात 20 जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचा इशारा स्थानिक प्रशासन आणि हवामान खात्याने केले होते. नागपूरमध्ये 217.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि अवघ्या काही तासातच वस्त्यांमध्ये पाणी शिरले. नागरिकांचे नुकसान झाले. नागपूर शहराचा विकास झाला असे म्हणत असाल तर या सर्व समस्यांचे निराकरण का होत नाही, असा सवाल विकास ठाकरे यांनी केला आहे.
थोड्यावेळाच्या पावसाने नागपुरात हाहाःकार माजला. महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे रस्त्यावर आणि आणि घरात पाणी साचले. लाखो करोडो रुपये नागपूरसाठी खर्च करण्यात येतात मग यात सामान्य जनतेसाठी कोणती सोय केली जाते, असा प्रश्न विकास ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
विकास कुणाचा झाला?
नागपूरच्या प्रकल्पासाठी रस्त्यासाठी, मेट्रोसाठी कोटी रुपये खर्च केले आहे परंतु नागपुरातील जनतेच्या विकासासाठी यातील थोडा तरी खर्च केला आहे का? थोड्याशा पावसाने नागपुरात हाहाःकार झाला. नागपूरकर पूर्णवेळ जीव मुठीत धरून होते. एवढा पैसा खर्च करूनही ही परिस्थिती निर्माण होत असेल तर विकास कुणाचा झाला, असा प्रश्न उपस्थित होतो, असेही ठाकरे म्हणाले.
म्हणून घरात पाणी आले
सिमेंट रस्ते बनविण्यात येत आहेत. सिमेंटच्या थरामुळे पाणी जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे. हेच पाणी नागरिकांच्या वस्तीत शिरत आहे. मेट्रोमुळे हीच समस्या उद्भवत गेली होती. अंबाझरी लगत असलेल्या फुलाचे काम सुरू आहे यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आमच्याकडे हल्दीराम प्रकल्पामुळे मार्ग रोखला. दहा वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च केले, पण सामान्य माणसाच्या सोयी सुविधांचा विचार झाला नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे.
शासनाचे होणार नुकसान
विकास ठाकरे यांनी नागपूर सुधार प्रन्यासवर देखील आरोप केले आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटरमुळे शासनाचे पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शासनाचे पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान होईल. एनआयटीची जागा विकसित करायला कंपनीला देण्यात आली होती. यानंतर अशा पद्धतीने याला सूट देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तेव्हा एनआयटी घाबरत नाही
सामान्य जनतेचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी एनआयटी घाबरत नाही. उदरनिर्वाहासाठी सामान्य जनता रस्त्यावर हातगाड्या लावते. त्यांना सुद्धा एनआयटी फेकून देते. मग पंधराशे कोटींचं नुकसान होत असताना सुद्धा यावर कारवाई का करत नाही, असा सवालही विकास ठाकरे यांनी केला आहे.