महाराष्ट्र

Lok Sabha Election : मुस्लिमांचा कौल ठरवणार नितीन गडकरींचे मताधिक्य ! 

Nitin Gadkari : प्यारे खान यांनी मुस्लिमांना भाजपकडे नव्हे तर गडकरी यांच्याकडे बघून मतदान करण्याचे आवाहन केले.

Nagpur Constituency : नागपूर लोकसभा मतदारसंघात सुमारे दीड लाखांच्या घरात असलेल्या मुस्लिम मतदार आहेत. या मतांवर महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वांचाच डोळा होता. अधिकाधिक मुस्लिमांनी मतदान करावे, यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले. नितीन गडकरींचे खंदे समर्थक आणि ताजबागचे अध्यक्ष प्यारे खान यांनी त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मुस्लीम मते वळवल्याचे सांगण्यात येते. नेमका हाच कौल गडकरींचे मताधिक्य ठरवणारा ठरणार आहे. 

11 मार्चला रमजान ईद आटोपल्यानंतर मुस्लिम वस्त्यांमध्ये प्रचाराचा धडाका वाढला होता. मुस्लिम मतदार हा काँग्रेसची परंपरागत मतपेटी मानला जातो. मात्र मुस्लिम बांधव फारसे मतदान करीत नाही. त्यातही महिला आणि मुलींची संख्या फार कमी असते. त्यामुळे एकगठ्ठा मतदान असतानाही त्याचा फायदा काँग्रेसला उचलता आलेला नाही. यावेळी ‘एमआयएम’ पक्षाने मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रखर हिंदुत्वाची भाषा बोलत असल्याने मुस्लिम समाज नाराज आहे. मुस्लीम मतदारांनी भाजपला मतदान केले, असे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. भाजपच्यावतीने ताजबागचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मुस्लिमांना भाजपकडे नव्हे तर गडकरी यांच्याकडे बघून मतदान करण्याचे आवाहन केले. गडकरी यांची प्रतिमा, धर्मनिरपेक्ष राजकारण, केलेला विकास यांची माहिती त्यांनी मुस्लिम बांधवांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

Lok Sabha Election : मुस्लिम समाजाने 100 टक्के मतदानाची केली प्रतिज्ञा !

एका सभेत बोलण्याच्या ओघात प्यारे खान यांनी भाजपमुळे नव्हे तर गडकरी स्वतःच्या बळावर निवडून आले असल्याचे म्हटले होते. त्यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेसने चांगलाच व्हायरल केला होता. काँग्रेसच्यावतीने याचे राजकारणही केले गेले. भाजपच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला गेला. त्याचा काय परिणाम झाला, हे 4 जूनला कळणार आहे.

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून अनिस अहमद दोन वेळा निवडून आले होते. ते राज्यात मंत्रीसुद्धा होते. मतदारसंघ बदलवताच त्यांचे राजकारण संपुष्टात आले. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासोबतही त्यांचे फारसे सौख्य नाही. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत काय भूमिका घेतली, हेसुद्धा निकालात दिसणारच आहे. पश्चिम नागपूरमध्ये उमेदवार असताना काँग्रेसच्याच काही नेत्यांनी पाडल्याचा आरोप त्यांनी खाजगीत केला होता. ते महाविकास आघाडीत आहेत. त्यांच्याच भूमिकेवरही अनेकांचे लक्ष होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!