वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्या येरवाडा कारागृहाच्या बाहेर पडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला पिस्तूल दाखवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आत्ता याप्रकरणी मनोरमा यांना न्यायालयाचा दिलासा मिळाला. त्यांचा जामीन न्यायालयानं शुक्रवारी (दि.२) मंजूर झाला होता. त्यानंतर शनिवारी (दि.३) सायंकाळी खेडकर यांची येरवडा जेलमधून सुटका झाली आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस रद्द झालेली उमेदवार पूजा खेडकर हिच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील न्यायालयाने पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पूजा खेडकर दुबईला गेल्याची चर्चा सध्या होत आहे. अशातच पूजा खेडकरची आई मनोरमा दिलीप खेडकर यांना जामीन मंजूर झाला आहे.
मनोरमा यांची आज येरवडा जेलमधून सुटका झाली आहे. शुक्रवारी पुणे न्यायालयाने मनोरमा खेडकर यांचा जामीन मंजूर केला होता. मुळशी मधील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 14 दिवसांच्या आधीच त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांना काल सायंकाळी येरवडा कारागृहातून सोडण्यात आलं. यावेळी त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला आले होते.
पूजा खेडकर हिची उमेदवारी यूपीएससीने रद्द केली आहे. हेच नाही तर पूजा खेडकर ही यूपीएससीच्या परीक्षा देखील देऊ शकणार नाहीये. पूजा खेडकरने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि त्यामध्ये दोषी आढळल्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. हा एकप्रकारे पूजा खेडकरला मोठा धक्काच देण्यात आलाय. हेच नाही तर पूजा खेडकरला यूपीएससीकडून दोषी ठरविण्यात आले आहे.
आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर दोन वर्ष प्रशिक्षणाचा काळ असतो. त्या दरम्यान प्रशासन समजून घेणे, कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे अपेक्षित असते. परंतू यादरम्यान पूजा खेडकरने कॅबिनची मागणी केली आणि थेट आपल्या खासगी गाडीला अंबर दिवा बसवला. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पूजा खेडकरची तक्रारही केली. पुण्याहून थेट वाशिमला तिची बदली करण्यात आली होती.
व्हायरल व्हिडिओ नंतर झाला होता गुन्हा दाखल
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अनेक ठिकाणी जमीनी विकत घेतल्या आहेत. गेल्या वर्षी 5 जून 2023 रोजी मुळशी तालुक्यातील धडवली येथील सर्व्हे नं.12/1 मध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न खेडकर कुटुंबियांकडून करण्यात आला. त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन एका शेतकऱ्याला धमकावल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.