Mahayuti 2.0 : ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ असे भगवद्गितेत प्रभू श्रीकृष्णानं सांगितलं आहे. कलियुगताही श्रीकृष्णाचा हा उपदेश अजरामर आहे. श्रीकृष्णानं सांगितलेल्या कर्मयोगावर विश्वास ठेवत आजही मार्गक्रमण करणारं नाव म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार. नागपुरात होणाऱ्या महायुतीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुनगंटीवार यांनी ‘द लोकहित’शी संवाद साधला. आपलं नाव यादीत नसल्याच्या विषयावर त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षानं जनसेवेचा अखंड महायज्ञ सुरू केला आहे. या महायज्ञात आपल्याला सहभागी होऊन त्यात त्यागाची समिधा टाकून जनसेवेचा हा यज्ञ असाच तेवत ठेवायचा आहे. त्यामुळं पद महत्वाचं नाही, तर जनसेवेचं व्रत महत्वाचं आहे, असं ते म्हणाले. ‘जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम’, या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याच्या ओळी या निमित्ताने आठवल्या.
‘रस्ता कट जायेगा मित्रा, बादल छट जायेगा मित्रा, तू एक पल रुक ना मित्रा’ त्याच गाण्यात या ओळी सुद्धा आहेत. अगदी याप्रमाणेच सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीची वाटचाल आजवर केलेली आहे. ‘पराभव झाला तर लाजायचं नाही आणि विजय झाला तर माजायाचं नाही’, हेच सुधीर मुनगंटीवार यांचे धोरण आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी जनसेवेचा हा यज्ञ असाच अखंड धगधगत राहणार यात कोणताही खंड पडणार नाही अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी ‘द लोकहित’शी संवाद साधताना अधोरेखित केली.
सलग 30 वर्षांपासून ते आमदार म्हणून जनसेवा करीत आहेत. विरोधी पक्षात असो किंवा सत्तेत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकतृत्वानं आगळावेगळा ठसा जनमानसात उमटविला आहे. ‘न भूतो, न भविष्यती’ अशी कामं आणि विक्रम मुनगंटीवार यांच्या नावावर आहेत. 50 कोटी वृक्ष लागवडीचा जागतिक विक्रम करणारे सुधीर मुनगंटीवारच होते. ‘गिनीस बुक’, ‘लिम्का बुक’मध्ये त्यांचं नाव आहे. स्वातंत्र्यानंतर एखाद्या राज्यानं ‘सरप्लस बजेट’ द्यावे ही ऐतिहासिक नोंद महाराष्ट्राच्या नावानं झाली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे नेटाने करून दाखवल.
राज्यातच नव्हे तर देश-विदेशा डंका
संस्कृतमध्ये एक श्लोक आहे. सर्वे कर्मवशा वयम्. अर्थात तुमचे कर्मच संगळं काही बोलतात. आमदारकीच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मुनगंटीवार यांनी केलेलं काम केवळ राज्यातच नव्हे तर देश-विदेशात बोलत आहे. ‘नाम में क्या रखा है’ असं म्हटलं जातं. त्यामुळं सुधीर मुनगंटीवार हे नाव एखाद्या मंत्रिपदाच्या नावातील ‘लेबल’साठी मर्यादित नसल्याचं बोललं जात आहे. परंतु सुधीर मुनगंटीवार यांनी झालेला निर्णय शिरसावंद्य मानत मिळेल ती जबाबदारी पार पाडण्याची तयारी ठेवली आहे. मुनगंटीवार हे यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्षदेखील होते. त्यावेळी त्यांनी राज्यभर कार्यकर्त्यांची सक्षम फळी तयार केली.
Sudhir Mungantiwar : राज्यातील धान उत्पादकांना दिलासा; नोंदणीच्या मुदतीत वाढ
‘न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्’ या संस्कृत म्हणीप्रमाणे जो ना प्रिय वस्तू मिळाल्यानं हुरळून जातो अन् जो ना अप्रिय वस्तू किंवा मनाविरुद्ध झाल्यानं विचलित होतो, अशा पठडीत मोडणारे व्यक्ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार असल्याचं त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून ठामपणे दिसून येत आहे.
मुनगंटीवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. संघ आपल्या स्वयंसेवकांना त्याग, तपस्या आणि बलिदान ही शिकवण देते. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक अनेक वर्ष तपस्या केलेल्या ऋषीसम असतो. ऋषी स्थितप्रज्ञ असतात. त्यांना मोह, माया आपल्या पथावरून विचलित करू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने संघाचा प्रत्येक स्वयंसेवक आपापलं कर्म चोखपणे बजावत राहतो. संघाची हिच शिकवण सुधीर मुनगंटीवार यांच्या नसानसात अन् रक्ताना प्रत्येक थेंबा थेंबात आहे. त्यामुळं पद मिळालं काय अन् न मिळालं काय, व्यथित होणारे सुधीर मुनगंटीवार नाहीत.
कार्यपूर्ती अटळ
चंद्रपूरचे पालकमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक प्रकल्प हाती घेतले होते. चंद्रपूरच्या ‘मेकओव्हर’ने प्रचंड वेग धरला होता. विकास कामाचा हा वेग थांबेल असं वाटत नाही. विकास कसा खेचून आणायचा हे सुधीर मुनगंटीवार यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळं केवळ एखादं मंत्रिपद नाही, म्हणून मुनगंटीवारांनी सुरू केलेली विकासाच्या गंगेचा प्रवाह आटेल असं अजिबातच वाटत नाही. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राचे वनमंत्री होते. व्याघ्रसंवर्धनासाठी त्यांनी मोलाचं काम केलं. वाघ हा जंगलाचा राजा असतो. ज्यांनी ज्यांनी वाघाला पाहिलं किंवा अनुभवलं असेल त्यांना वाघाची एक कृती चांगलीच ठाऊक असते. वाघ कधी कधी काही पावलं मागे जातो. त्यानंतर तो प्रचंड मोठी झेप घेतो. त्यामुळं अगदी तसंच याहीपेक्षा मोठी जबाबदारी पक्षानं मुनगंटीवार यांच्यावर सोपविण्याचा निर्णय घेईल, असं यातून दिसत आहे.
मुनगंटीवार यांच्या नावात ‘सुधीर’ आहे. याचा मूळ अर्थ उज्ज्वल आणि स्पष्ट असा आहे. त्यामुळं स्पष्टवक्ता असलेल्या मुनगंटीवार यांना उज्ज्वल काम करण्यासाठीच निवडलं जाईल यात शंका वाटत नाही. सुधीर या नावाचा सुसंस्कृत प्रमाणे एक आणखी अर्थ काढता येईल. ‘सु’ अर्थात चांगला. धीर अर्थात धैर्य. त्यामुळं कोणतंही आव्हान, कोणतीही जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम असलेल्या मुनगंटीवार यांना नक्कीच काही तरी वेगळी जबाबदारी मिळेल किंवा मिळेल त्या संधीचे ते सोने करतील, यात तिळमात्र शंका नाही.
आजपर्यंत सरकारमधील अनेक मृतप्राय विभागांमध्ये जान फुंकणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांना आता भाजप कुठला नवसंजीवनीचा द्रोणागिरी नेण्याची जबाबदारी देते, याची प्रतीक्षा आहे.