Maharashtra Legislature : महाराष्ट्राचे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जून गुरूवारपासून सुरू झाले आहे. यामध्ये विधान परिषदेच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्यात सुरु असलेल्या पोलिस भारतीमधील बहुतांशी जिल्ह्यामध्ये उम्मेदवारांचे हाल होतांना दिसत आहे. यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी सभागृहात केली. यावर गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तशा सूचना प्रशासनाला देण्यात येतील असे आश्वासन दिले.
पोलिस विभागातील 17 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी तब्बल 17 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात होत असलेल्या या पोलिस भरतीसाठी आलेल्या मुला-मुलींच्या राहण्याची काहीही सोय नाही, त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. भरपावसात पोलीस भरती सुरु असून, भरतीसाठी आलेल्या मुलांना पावसात रस्त्याच्या कडेला, उड्डाण पुलाखाली आसरा घ्यावा लागतो. पोलिस भरतीसाठी आलेल्या या मुलांची राहण्याची व इतर व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रावसाहेब दानवे यांनी विधान परिषदेत केली आहे.
फडणवीसांची ग्वाही
दानवे यांच्या सभागृहातील मागणी नंतर गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, पोलिस भरती बाबत सर्व युनिट्सला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पुन्हा नव्याने उपाय योजना करण्यासंदर्भात आदेश देण्यात येतील. शक्य तेथे मंगल कार्यालये घेऊन तेथे व्यवस्था करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
घेरण्याची तयारी
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना चहापानाचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, चहापानाच्या कार्यक्रमांवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच सरकारच्या कामावरून विरोधकांनी सडकून टीका केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
Maharashtra Legislative Assembly : 8 आमदारांचे राजीनामे मंजूर, परिषदेच्या 5 सदस्यांना निरोप !
“राज्यातील विविध प्रश्नांवरुन आम्ही अधिवेशनात सरकारला घेरणार आहोत. हे सरकार राज्यातील अनेक प्रश्न सोडवण्यास अयशस्वी ठरले आहे,” असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आता 28 जून शुक्रवारपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगणार आहे.